धाराशिव– ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. डॉ. सावंत यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे सांगितले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख २४ हजार महिलांना लाभ देण्याचे नियोजन असून, १४ ऑगस्टपर्यंत २ लाख ८१ हजार ३२२ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. युवा वर्गासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील १०२ शासकीय कार्यालयांनी २२५८ पदे अधिसूचित केली असून, ११० हून अधिक प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.
गावांमध्ये दहनशेड बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २६ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दहन किंवा दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसलेल्या ३६१ गावांपैकी २१० गावांमध्ये शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी जागा खरेदीसाठी ४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’ अंतर्गत ५० खाटांचे क्रिटिकेअर युनिट बांधण्यासाठी २३ कोटी ७५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ३६१ कोटी रुपये निधीतून ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय बांधण्यात येणार आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत ६ लाख ४५ हजार २७ मातांची तपासणी करण्यात आली. ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ मोहिमेअंतर्गत ५ लाख ४८ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियानांतर्गत ४ लाख २० हजार बालकांची आरोग्य तपासणी करून २३७ बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
खरीप हंगाम २०२३ च्या दुष्काळात बाधित १ लाख २२ हजार शेतकऱ्यांना १४५ कोटी १३ लाख रुपये वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील ७०० रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास युवक-युवतींसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येत असून, २७४१ लाभार्थ्यांचे १८० कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत ५ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना २९७ कोटी रुपये विमा भरपाई वितरित करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ४४ हजार ६६४ शेतकऱ्यांना १३० कोटी ५८ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ११ हजार २४९, रमाई आवास योजनेअंतर्गत १३ हजार ३२४ आणि शबरी आदिवासी आवास योजनेअंतर्गत ३०६ घरकुले पूर्ण झाली आहेत.
पालकमंत्र्यांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.