धाराशिव: धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाला तब्बल एक वर्षानंतर जिल्हा शल्य चिकित्सक मिळाला आहे. डॉ. धनंजय चाकूरकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव व. पां. गायकवाड यांनी हा बदली आदेश काढला आहे.
डॉ. चाकूरकर यापूर्वी कोकणातील दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक होते. तत्पूर्वी ते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात आणि धाराशिव जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या विनंतीनुसार दापोली येथून थेट धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार देण्यात आला आहे.
डॉ. राजाभाऊ गलांडे यांची प्रतिनियुक्ती घोटाळ्याप्रकरणी मुरुडच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर २३ सप्टेंबर २०२३ रोजी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते.
धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभार स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत होता. रुग्णांकडे दुर्लक्ष आणि स्वतःच्या हॉस्पिटलकडे जास्त लक्ष असल्याच्या तक्रारी येत होत्या. डॉ. चाकूरकर आता कशापद्धतीने कारभार हाताळतात याकडे लक्ष वेधले आहे.