धाराशिव : युवकांचा सर्वांगीण विकास करणे,संस्कृती व परंपरा जतन करणे,युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतीवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.सन 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व कृषी आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.
युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो.संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केलेले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर तसेच सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिली आहे.या संकल्पनेवर आधारित जिल्हा,विभाग व राज्यस्तर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक बाबींमध्ये समूह लोकनृत्य,वैयक्तीक सोलो लोकनृत्य,लोकगीत,वैयक्तीक सोलो लोकगीत आदींचा समावेश आहे. कौशल्य विकास या बाबींमध्ये कथाकथन,पोस्टर स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी),फोटोग्राफी आदींचा समावेश आहे.संकल्पना आधारित स्पर्धा या बाबींमध्ये राज्यात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर तसेच सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान आदींचा समावेश आहे.युवा कृती या बाबींमध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग व ॲग्रो प्रोडक्ट आदींचा समावेश आहे.
सन 2023-24 या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. यासाठी आपली नाव नोंदणी सोबत जोडलेल्या परिपत्रकातील बाबनिहाय विहित नमुन्यातील अर्जासह 22 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम समिती, धाराशिव येथे प्रत्यक्ष किंवा districtsports.osmanabad@gmail.com या ईमेल आयडीवरती अथवा 9923531423 या व्हॉटस्अप नंबरवरती पाठविण्यात यावी.अधिक माहितीकरीता क्रीडा अधिकारी कैलास लटके (9923531423) यांच्याशी संपर्क करावा. इच्छुक कलावंतांनी व स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याबाबत आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.