धाराशिव : महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये महायुतीला दोन, तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या दोन आमदारांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सन २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना अखंड होती. त्या वेळी शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने एक जागा जिंकली होती. मात्र, त्या वेळी शिवसेना किंवा भाजपच्या कोणत्याही आमदाराला मंत्रिपद मिळाले नव्हते. दरम्यान, शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी झालेल्या फूटीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार विभक्त गटांत सामील झाले.
शिंदे गटात आमदार तानाजी सावंत (परंडा) आणि ज्ञानराज चौगुले (उमरगा) सामील झाले, तर ठाकरे गटात कैलास पाटील (धाराशिव) राहिले. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदें यांच्याकडे आल्यानंतर तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. मात्र, तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते.
या वर्षीच्या निवडणुकीत महायुतीने राज्यात २८८ पैकी २३२ जागांवर विजय मिळवून दणदणीत यश मिळवले आहे. धाराशिव जिल्ह्यात तानाजी सावंत (शिंदे गट) आणि राणा जगजितसिंह पाटील (भाजप) पुन्हा निवडून आले. परंतु, उमरग्याचे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर त्या जागेवर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी विजयी झाले.
उर्वरित तीनही मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांनी आपली जागा कायम ठेवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या दोन आमदार मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंड्याचे आमदार आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रीपदावर हक्क सांगितला आहे, तर भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी प्रखरपणे पुढे येत आहे.
मंत्रीपदासाठी उत्कंठा वाढली
मुख्यमंत्री कोण होणार आणि नव्या मंत्रिमंडळाची रचना कशी होईल, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. धाराशिव जिल्ह्यात महायुतीच्या आमदारांची भूमिका ठळक ठरणार आहे. तानाजी सावंत यांचा अनुभव पाहता त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, गेल्या वेळी अपूर्ण राहिलेले राणा जगजितसिंह पाटील यांचे मंत्रिपदाचे स्वप्न या वेळी पूर्ण होण्याची आशा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास त्यांना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राणा जगजितसिंह पाटील यांना पालकमंत्री करा – अमरराजे कदम ( Video)