धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धाराशिव शहर, आनंदनगर, बेंबळी, उमरगा आणि परंडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबरी विभागात राहणारे संजय जगन्नाथ टेकाडे यांच्या घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यातील १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २२,५०० रुपये रोख असा एकूण १,१५,६५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोटरी क्लब डोळ्याच्या दवाखान्यात काम करणारे ज्ञानोबा राजाभाउ थडवे यांची १५,०00 रुपये किमतीची स्पेलंडर प्रो मोटरसायकल चोरीस गेली आहे. ही मोटरसायकल २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० ते २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दवाखान्याच्या आवारातून चोरीस गेली.
बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारफळ येथील सुरज ज्ञानेश्वर कोळगे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २ मोबाईल फोन आणि ६०,००० रुपये रोख असा एकूण १,०७,१६० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही घटना ३० डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११.३० ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर येथील प्रशांत मल्लिनाथ पाटील यांच्या आरोग्य नगरी येथील पाटील मशिनरी दुकानाचा पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील ८ पानबुडी मोटार, सबमर्सिबल पंप, केबल असा एकूण १२,०१,१४२ रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही घटना २९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.३० ते ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.
परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम पार्क येथील प्रमोद मोतीराम जनबंधु यांच्या घरातील बेडरूममधील कपाटातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४,५०० रुपये रोख आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे तीन चावी जुडगा पाउच असा एकूण ६४,५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही घटना ३० डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११ ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
या सर्व घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरांची आणि दुकानांची सुरक्षा व्यवस्थित करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी घराबाहेर दिवे लावून ठेवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.