धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा वेगळाच रंग समोर आला आहे. उमेदवार त्यांच्या प्रचारात बुडाले असताना, निवडणूक विभागाने मात्र ‘सुपरफास्ट’ गाडी चालवली आहे. नाही हो, प्रचार गाडी नाही, चक्क जिल्हा परिषदेच्या चालकांना मतदान केंद्रावर “मतदान अधिकारी” म्हणून नेमून टाकले आहे!
आता घ्या तानाजी तुपे यांना. ते रोज महिंद्रा पिकअपवर जिल्ह्यात लस आणि गोळ्या पोहोचवतात. पण २० नोव्हेंबरला मात्र त्यांनी “लोकशाहीची लस” पोहोचवायची आहे – तीही मतदारांच्या बोटांवर शाई लावून!
तानाजी तुपे सांगतात, “साहेब, मी गाडी चालवतो, इलेक्शन काय चालवू? मी काय शिकलेलो नाही!” पण जिल्हाधिकारी साहेब म्हणाले, “अरे तानाजी, फक्त बोटावर शाईच तर लावायची आहे. त्यासाठी काय डॉक्टरेटची गरज आहे का?”
हे ऐकून, तानाजी चक्रावलेच. मतदानाचे काय करायचं हे समजून घेण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण द्यायला लावलंय. गाडीच्या स्टेरिंगवरून सरळ मतदारांच्या ओळखपत्रांवर सही करण्यापर्यंत तानाजींचा प्रवास सुरु झाला आहे.
अजून किती ड्रायव्हर मतदान अधिकाऱ्यांच्या सीटवर बसले आहेत, ते एक गूढच आहे. तानाजींच्या मते, “चालक असो वा मतदान अधिकारी, शेवटी आपण लोकशाहीचे ड्रायव्हरच!”
तर, आता लक्ष ठेवा – या निवडणुकीत मतदारापेक्षा चालक जास्त हुशार आहेत! साहेब म्हणतात, “लोकशाही चालवायची आहे, गाडी नाही!”