धाराशिव – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी आमदार होण्यासाठी अर्ज दाखल करण्याची धडपड सुरू केली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर तर अर्ज परत घेण्याची ४ नोव्हेंबर. पण निवडणूक म्हटलं की अफवा हे एक अटळ समीकरण आहे, आणि त्या जोडीला निवडणूक अधिकारी, पोलीस, आणि पत्रकारांची धावपळ तर आलीच!
आज धाराशिव तालुक्यातील वाघोली येथे काही स्थानिक तरुणांनी ‘कोट्यवधी रुपये असलेली इनोव्हा गाडी पकडली’ अशी एक भन्नाट अफवा दुपारी पसरली. मग काय? सनसनाटी बातमी मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन सात ते आठ चॅनेल आणि युट्युबवरील बातमीदारांनी चक्क चारचाकी, दुचाकीवरून वाघोलीला धाव घेतली.
गावात पोहोचल्यावर मात्र पत्रकारांची घोर निराशा झाली. ना कोट्यवधींची गाडी, ना गाडी पकडण्याचं प्रकरण!
एका हटकलेल्या गावकऱ्याने बॅनरचा वाद सांगितला, तर दुसऱ्याने दोन गाड्या आल्या आणि एकमेकांना घेऊन गेल्याचं सांगितलं . म्हणजे काय? काहीच समजलं नाही!
अखेर ‘कुठं गाडी – कुठं गड्याला’ असं म्हणत पत्रकारांनी गावाला निरोप दिला. बातमी हाती न लागल्याने त्यांनी आपलीच फजिती करून परतावे लागले. आता निवडणुकीत अफवांचा ट्रॅक कायम राहणार हे नक्की!