धाराशिव : येथील तुळजापूर नाक्यावर राहणाऱ्या पाच जणांनी शाहुनगर येथील एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर नाक्यावर राहणारे दत्तात्रय सुरवसे, उर्मिला सुरवसे, प्रतिक्षा कांबळे, संतोष सांळुखे आणि सौदागर सुरवसे यांनी शाहुनगर येथील अजय कांबळे (वय २९) यांना ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मारहाण केली. कौटुंबिक वादातून हा वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी कांबळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, लाकडी बांबूने मारहाण करून त्यांना जखमी केले.
या घटनेनंतर कांबळे यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वैद्यकीय पुराव्याच्या आधारे दत्तात्रय सुरवसे, उर्मिला सुरवसे, प्रतिक्षा कांबळे, संतोष सांळुखे आणि सौदागर सुरवसे या पाचही जणांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.