धाराशिव – जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे, त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले असून, रब्बीची आशा मावळली आहे. तरीही आठ पैकी धाराशिव , लोहारा आणि वाशी हे तीनच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत , तसेच खरीप अग्रीम विमा ५७ पैकी ४० मंडळांना मिळणार असून, १७ मंडळे वगळण्यात आली आहेत. विमा प्रकरणी भेदभाव करण्यात आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
‘दुष्काळ’ हा धाराशिव जिल्ह्याच्या पाचवीला पुजला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. पिण्याची पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. जिल्ह्यात मोठा 1, मध्यम 17, लघु 208, असे एकूण 226 प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांची 726.962 दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. मात्र, जुलैअखेरीस एकूण प्रकल्पात फक्त 53.2468 दलघमी पाणी असून, त्याची टक्केवारी 7.32 इतकी आहे. जिल्ह्यातील 34 प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना, धाराशिव , लोहारा आणि वाशी हे तीनच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा, कळंब तालुक्यावर अन्याय करण्यात आला आहे , त्याचबरोबर जिल्ह्यातील ५७ पैकी ४० मंडळांना खरीप पीक विमा चा अग्रीम वाटप करण्यात आला तर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम,वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या १७ मंडळावर अन्याय करण्यात आला आहे. या मंडळांनी घोडे मारले का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
तुळजापूर तालुक्यात एकूण ९ मंडळे आहेत. त्यातील फक्त नळदुर्ग वगळता अन्य आठ मंडळांना अग्रीम देण्यात आला आहे , त्यामुळे नळदुर्ग मंडळातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यातील वगळलेल्या १७ मंडळांना अग्रीम न दिल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता आहे.