धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करत आहेत. इथला शेतकरी पावसावर अवलंबून असल्यामुळे, हवामानातील बदलांची त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. दोन वर्षे कोरडा दुष्काळ, तर एक वर्ष ओला दुष्काळ ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नेहमीचीच स्थिती बनली आहे. पाऊस पडला नाही तर पिके जळून जातात, आणि पडला तर एवढा की पिकांचे आणि जमिनीचे नुकसान होते. अशा प्रकारच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अस्थिरता निर्माण झाली आहे, ज्याचे परिणाम त्यांच्या रोजीरोटीवर होतात. विशेषतः जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक घेतले जाणारे पीक म्हणजे सोयाबीन. शेतकऱ्यांच्या प्रमुख आर्थिक आधार असलेल्या या पिकातही मोठी अस्थिरता आहे. सोयाबीनचे दर सतत बदलत असतात आणि हे दर शेतकऱ्यांसाठी अनुकूल नसतात. मागील वर्षी सोयाबीनचे दर ४,५०० रुपयांवर घसरले होते, जे उत्पादन खर्चाच्या तुलनेत फारच कमी आहेत. विशेष म्हणजे, उत्पन्न घटलेले असताना दर वाढतात, आणि उत्पादन चांगले झाले तर दर कोसळतात. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अपेक्षित किमतीसाठी संघर्ष करावा लागत आहे.
सोयाबीन व्यतिरिक्त, धाराशिव जिल्ह्यात मूग, उडीद आणि इतर पिकेही घेतली जातात. परंतु या पिकांमध्येही हवामानाच्या बदलाचा मोठा परिणाम होतो. या वर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक पिके नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मजुरीतही वाढ झालेली आहे. शेतातील मजुरांना पुरुषांना एका दिवसाचे ७०० रुपये आणि महिलांना ५०० रुपये मजुरी मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर्षीही अशीच स्थिती असून, शासनाकडून कोणतीही तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी तुळजापूर, उमरगा आणि भूम हे तीन तालुके अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहेत. या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, काढणीला आलेल्या सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने या तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळल्याने या भागातील शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणार नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. हे पाहता शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील या तिन्ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. परंतु प्रशासनाच्या निर्णयामुळे या भागातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयाविरुद्ध महाविकास आघाडीने जोरदार निषेध नोंदवला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर सुधारित अहवाल देऊन या तिन्ही तालुक्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे गरजेचे आहे. अन्यथा, शेतकरी आंदोलन करण्यासही मागे हटणार नाहीत, असे महाविकास आघाडीने सूचित केले आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनात समाधान निर्माण करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. दर वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडतो, त्यावर शासनाकडून अनुदानित मदतीची अपेक्षा असते. मात्र, सरकारने योग्य तो निर्णय न घेता काही तालुक्यांना मदतीपासून वंचित ठेवले, हे निश्चितच अन्यायकारक आहे. शेवटी, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्याच्या उद्ध्वस्त अवस्थेत त्याला मदत मिळणे हे त्याचे हक्काचे आहे. शासनाने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जावे, अशी अपेक्षा आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह