धाराशिव – स्थानिक गुन्हे शाखेत बसणं म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी सांभाळण्यासारखं! या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी पोलीस कर्मचारी आकाश-पाताळ एक करायला तयार असतात. कुणी पैसे मोजून येतो, तर कुणी राजकीय नेत्यांचे वशिलें घेवून. म्हणे ‘बळी तो कान पिळी’ असं इकडे लागू होतं.
असाच एक कोंबडीचा मालक नुकताच सोलापूरला बदलून गेला आणि बारामतीचे साहेब आता मालक झाले आहेत . त्यांची स्टाईल म्हणजे “नवा गडी राज नवा” असं चांगलंच दिसून आलं. आल्या – आल्या नव्या साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांची ‘आपला-परका’ यादी तयार केली आणि जुन्या पीआयच्या हकालपट्टीची माती उचलली.
पण मोठी अडचण आली. जुने पीआय देखील जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेल्या राजकीय नेत्याचा वशिला वापरून आलेले. आता बदली करावं म्हटलं तर राजकीय नेत्याची नाराजी . त्यामुळे ‘मोरां’चे पिसे काढून घ्यावेत तसे साहेबांनी जुन्या पीआयची पिसे काढून घेतली आणि ‘काना‘मागून आला आणि तिखट झाला अशी परिस्थिती निर्माण झाली. आता वसुलीसाठी नवी ‘गुढी‘ उभारण्यात आली आहे. त्यामुळे जुना ‘मोर’ नव्या साहेबांपुढे पिसारा फुलवण्याऐवजी त्याचा लांडोर होवून बसलाय आणि आणि अर्थ विभागाचा लांडोर मोरासारखा पिसारा फुलवत जिल्हाभर नाचत फिरू लागलाय.
अजून गंमतीशीर भाग म्हणजे नवीन साहेब आल्यानंतर स्थागुशामध्ये जाण्यासाठी अनेकांनी वशिला लावलाय. गादीवर बसण्यासाठी शर्यत सुरु झाली आहे. शिराढोणच्या झेंडा प्रकरणी बदली झालेल्या एकाच कर्मचाऱ्याला सध्या ही मानाची गादी देण्यात आली आहे. अजून पाचजण या रांगेत आहेत. आचारसंहिता लागण्याअगोदर गादीवर बसण्यासाठी ‘मंगेशा‘च्या देवळात जावून ‘चिवट’ पणे पत्र आणतोय. त्यामुळं संपूर्ण धाराशिव विभागात आता चर्चा सुरू आहे की, वशिला आणि पैसा बोलता है भाई!