पेंद्या – आरं ये पक्या, काय म्हणतंय आपलं धाराशिवचं इलेक्शन ?
पक्या – अर्रर्र , काय सांगू तुला… राजकारणाचा नुस्ता चिखल झाला बघ…
पेंद्या – ऑ , काय सांगतोस ?
पक्या – ह्यो त्याला ठग म्हणतोय तर तो त्याला गद्दार म्हणतोय…
पेंद्या – अर्रर्र प्रचाराचा स्तर लईच घसरला म्हणायचा …
पक्या – ह्यो त्याला खेकडा म्हणतोय तर तो त्याला भंगारचोर म्हणतोय…
पेंद्या – च्या मारी… असं एकमेकांना नाव ठेवण्यापेक्षा ईकासावर काही तरी बोला म्हणावं…
पक्या – ईकासावरून सुद्धा बरीच राळ उठलीया…
पेंद्या – मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिवचा तिसरा क्रमांक लागलाय… या नेत्यांना जरा लाज बाळगा म्हणावं…
पक्या – ओमदादा म्हणत्यात, याला सर्वस्वी जबाबदार डॉ. पाटील हायती…
पेंद्या – ऑ , ते कसं काय ?
पक्या – मागील चाळीस वरीस डॉ. पाटलांची सत्ता व्हती … त्यांनी फकस्त नातेवाईकांचा ईकास केला, असं त्यांचं म्हणणं….
पेंद्या – डॉ. पाटलांचा कारभार तर ओमदादाचे वडीलच हाकत व्हते की …
पक्या – आता ते कोण सांगणार बाबा ?
पेंद्या – मल्हार दादा भाषणात बोलताच की ..
पक्या – त्यांच्यावर देखील ओमदादा लईच टोकाचं बोलत्यात…
पेंद्या – तेच की , वडील बीजेपीमधी .. आई चोरलेल्या राष्ट्रवादीमध्ये ..
पक्या – इतकंच काय, आता मल्हार दादाच्या किडनीत शिंदेची शिवसेना आन लिव्हरमध्ये मनसे टाका असेही म्हणत्यात…
पेंद्या – अर्रर्र भाऊबंदकीचा वाद लईच खालच्या थराला गेलाय म्हण की …
पक्या – इलेक्शन म्हंटलं की , आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत्यात… पण इतक्या खालच्या दर्जाला दोघेजण जायला नको…
पेंद्या – बरं , आपल्याकडं मोदी साहेब येणार हाईत म्हण..
पक्या – मागील दहा वर्षात पहिल्यांदाच धाराशिवला येताहेत. बघ . ..
पेंद्या – म्हाद्या म्हणत व्हता, ओमदादाने हवा टाईट केली म्हणून राणा दादांनी खुद्द मोदीं साहेबाना बोलावलं..
पक्या – कुणी जरी आलं तरी मतदारांच्या मनात काय आहे, हे कळत नाय बाबा…
पेंद्या – तेबी बरुबर हाय, पण अटीतटीची लढत होणार हे मात्र नक्की…
पक्या – कुणी जरी आलं तर २५ ते ५० हजार मतांनी येणार, असा अंदाज हाय बघ…
पेंद्या – बरं , बस्स झाल्या आता इलेक्शनच्या गप्पा, गंगीने किराणा आणायला सांगितलाय… येतो मी…
( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )