धाराशिव शहरातील आनंदनगर भागातील ग्रीनलँड शाळा सध्या शिक्षणापेक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. इथला कारभार असा आहे की, विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा कसं टिकावं याचा अधिक सराव मिळतो. कारण शाळेच्या शेजारीच ‘स्वागत’ बियर बार असून, नियमाला हरताळ फासत तो निर्धास्त सुरू आहे. नियम असा आहे की, शाळेपासून ५०० मीटरच्या आत बियर बार नसावा, पण इथे शिक्षण विभागाने स्वतःहून हा नियम विसरायचं ठरवलं आहे. परिणामी, शाळेच्या आजूबाजूला बारचा माहौल आणि शाळेच्या आत गोंधळाचं राज्य असं विचित्र चित्र उभं राहिलं आहे.
शाळा छोटी, विद्यार्थी मोठ्या संख्येने लहान
ग्रीनलँड शाळेची इमारत एवढी छोटी आहे की, श्वास घेतलात तरी वर्गाच्या भिंती खसाखसा हलतील. विद्यार्थ्यांची संख्याही एवढी वाढली की, एका बाकावर दोन नव्हे, तर तीन-तीन विद्यार्थी बसतात. संस्थेने ही समस्या सोडवण्यासाठी शेकापूर रोडवर नवीन इमारत उभारली. पण आता नवीन गोंधळ सुरू—जिथे शाळेला परवानगी आहे, तिथेच शिकवावं लागणार! म्हणजे विद्यार्थी जुन्या जागेत गुदमरावेत आणि नवीन इमारत मूकदर्शक बनून बघत बसावी!
आरटीईच्या नावावर पालकांची ‘टीई’
शिक्षणाच्या हक्काचा कायदा (RTE) स्पष्ट सांगतो की, २५% गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, वह्या, पुस्तके आणि वाहन सुविधा द्यावी लागेल. पण ग्रीनलँड शाळेने हा नियम वेगळ्याच प्रकारे ‘अभ्यासला’ आहे. इथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तर मिळतंच, पण त्या ‘मोफत’साठी भरपूर पैसे द्यावे लागतात! फी वेळेवर न भरल्यास परीक्षा देऊ दिली जात नाही—याला म्हणतात शिक्षणातील ‘सुसंस्कृत दरोडा’!
शिक्षकांचे शिक्षण ‘संदिग्ध’ पण शोषण स्पष्ट
या शाळेतल्या काही शिक्षकांना डीग्रीचा ‘ड’ माहीत नाही. शिकवण्याचा अनुभव शून्य असला तरी, शिकवण्याची जबरदस्ती मात्र शंभर टक्के आहे. आणि जे शिक्षक योग्य पात्रतेचे आहेत, त्यांना पगार एवढा कमी दिला जातो की, ते स्वतःच शिकवण्याऐवजी शिकण्याचा विचार करतील. विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही या व्यवस्थेचे बळी ठरत आहेत, पण संस्थाचालक मात्र मोठ्या हिशोबाने हिशेब चुकवत आहेत.
संस्थाचालकांचा ‘डबल गेम’
शाळेचा कारभार ‘गृहशिक्षकांच्या’ हाती आहे. म्हणजेच संस्थाचालक मॅडमच्या मिस्टर सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयात वरिष्ठ व्याख्याते (Senior Lecturer) आहेत. पण तिथे त्यांचा व्याख्यानाच्या बाबतीतला रस फक्त हजेरीपर्यंतच मर्यादित असतो. एकदा हजेरी झाली की, लगेच ‘ग्रीनलँड शाळेच्या व्यवस्थापनावर’ लक्ष केंद्रित होतं. थोडक्यात, सरकारी नोकरीचा पगार आणि खासगी शाळेतील कमाई दोन्ही हातांनी उचलायची सोय त्यांनी करून घेतली आहे!
शिक्षण विभागाचा ‘आसनस्थ समाधी’ मोड
शाळेतील गोंधळाबद्दल तक्रार शिक्षण उपसंचालक, लातूर यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी संस्थेवर कारवाईचे आदेशही दिले, पण शिक्षण विभागाने “ध्यानस्थ योगी” असल्यासारखं गप्प बसणंच पसंत केलं. त्यांच्या हातात घड्याळ आणि तोंडावर बोट—म्हणजेच कारवाई करायची नाही आणि बोलायचंही नाही!
पालकांचा प्रश्न – ‘स्वागत’ बारमध्ये प्रवेश घ्यावा का शाळेत?
या सर्व प्रकारानंतर पालक संभ्रमात आहेत—विद्यार्थ्यांनी शाळेत जावं की बियर बारमध्ये? कारण एकीकडे शिक्षणाच्या नावावर शाळेत लूट सुरू आहे, तर दुसरीकडे ‘स्वागत’ बियर बार अगदी आनंदाने स्वागत करायला तयार आहे!
शिक्षण विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. नाहीतर लवकरच या शाळेच्या फलकावर “एडमिशन ओपन – शिक्षणासोबत मनोरंजन फ्री!” असं लिहिलेलं दिसलं, तर नवल वाटायला नको!