धाराशिव – धाराशिव शहरातील पोलीस उपअधीक्षक कार्यालयाजवळ एका आरोग्य सेवकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रभारी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती.
याप्रकरणी आरोग्य सेवक तुकाराम चंद्रहास खोत (वय ५५, रा. गोवर्धनवाडी, ता. जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात मारुती रामराव कोरे (रा. प्रशासकीय इमारत, धाराशिव) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुकाराम खोत हे वाशी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते धाराशिव येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयाजवळील पोलीस कॅन्टीनसमोर सार्वजनिक रस्त्यावर थांबले होते. यावेळी आरोपी मारुती कोरे, जे प्रभारी हिवताप अधिकारी आहेत, यांनी खोत यांना जातीवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर दीड महिन्यांनी, तुकाराम खोत यांनी शनिवारी (दि. २६ जुलै) रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मारुती कोरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३५२ (धमकी) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.