धाराशिव – बस स्थानकासमोर असलेल्या सुनील प्लाझामध्ये जवळपास ३० ते ४० दुकाने आहेत. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटीवर शनिवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्यामुळे पोलिसांसह शहरातील जनता चक्रावून गेली आहे. गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार लपवण्यासाठी पतसंस्था कर्मचाऱ्यांनी दरोड्याचा बनाव तर केला नाही ना ? अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
सुनील प्लाझामध्ये असलेल्या ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटीवर शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून चार किलो सोने आणि १ लाख ४० हजार रुपये असा १ कोटी ८७ लाखाचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार व्यवस्थापक सतीश फुटाणे यांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
पाच दरोडेखोर येतात, व्यवस्थापक सतीश फुटाणे यांना पिस्तूल दाखवतात आणि चार किलो सोने आणि १ लाख ४० हजार रुपये शांतपणे घेऊन जातात, हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असला तरी हा प्रकार दरोड्याचा वाटतच नाही.गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार लपवण्यासाठी पतसंस्था कर्मचाऱ्यांनी दरोड्याचा बनाव तर केला नाही ना ? अशी शंका वाटत आहे.
सुरुवातीला ५१ तोळे सोने गेले सांगणारे पतसंस्था कर्मचारी आता चार किलो सोने होते म्हणून सांगत आहेत. इतके सोने आले कुठून ? कोटींचा माल होता तर सुरक्षा रक्षक का ठेवला नाही ? दरोडेखोर आल्यानंतर आरडाओरड का केली नाही किंवा गेल्यानंतर आरडाओरड का केली नाही ? पिस्तूल लावल्यानंतर घाबरलेला किंवा भेदरलेला चेहरा वाटत नाही, तसेच सोने ठेवण्यासाठी तिजोरी होती का ? मग अलार्म का वाजला नाही , असे एक ना अनेक प्रश्न आहेत. एकंदरीत प्रकार बेबनाव वाटत आहे. सब गोलमाल है अशी चर्चा सुरु आहे. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी हे कुंभांड रचले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
एरव्ही पोलीस सोने चोरीची फिर्याद घेताना पावतीची विचारणा करतात , मग पतसंस्थेवला कोणता पुरावा मागितला ? पोलीसांचे हात ओले झाले का ? अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे. फिर्यादीच आरोपी निघण्याची शक्यता यानिमित्त व्यक्त केली जात आहे.