धाराशिव: येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉ. बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयात वर्गात घुसून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात इम्तियाज शेख आणि त्याच्यासोबत आलेल्या एका अनोळखी इसमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी महाविद्यालयात ‘कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी’च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सुमारे ११:१५ च्या सुमारास कॉलेजच्या इंटरव्हलदरम्यान सुरज सुहास काशिद हा विद्यार्थी वर्गात आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना, शेख चाँद सुलताना या दोघा इसमांसोबत तेथे आल्या. त्यापैकी एकाने सुरजला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्या दोघांनी सुरजला वर्गाबाहेर काढत, कॉलर पकडून जिन्यावरून ओढत खाली आणले आणि अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळी प्रबुद्ध गायकवाड या विद्यार्थ्याने व महाविद्यालयाचे शिपाई बशीर अत्तार यांनी मध्यस्थी करत सुरजची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. मारहाण करणाऱ्यांनी सुरज आणि प्रबुद्ध यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून, “आम्ही तुमचे फोटो काढले आहेत, बाहेर आल्यावर बघून घेऊ,” अशी धमकीही दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल
महाविद्यालयाच्या आवारात शांततेचा भंग करून विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी इम्तियाज शेख व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११५(२), १९४(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा (FIR क्र. ०३९९/२०२६) नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अशोक मोहन पवार करत आहेत।
मी विधी महाविद्यालयात शिकत आहे, गेल्या काही दिवसापासून सुरज सुहास काशिद आणि प्रबुद्ध गायकवाड हे छेडछाड करीत होते, ३० सप्टेंबर रोजी त्यांनी माझा विनयभंग केला, तेव्हा मला रडू आले आणि मी माझ्या पतीला फोन केला, तेव्हा ते विधी महाविद्यालयात आले, त्यांनी सूरज काशीद यास पोलीस स्टेशनला चल म्हणत होते, तेव्हा विद्यार्थांनी गोधळ घातला , माझ्या पतीने त्यांना मारहाण केलेली नाही, तसेच माझे पती आले तेव्हा प्रबुद्ध गायकवाड उपस्थित नव्हता, माझे वडील इम्तियाज शेख देखील उपस्थित नव्हते, तरीही माझ्या वडिलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, याविरूद्ध आम्ही न्यायालयात दाद मागू..
– शेख चाँद सुलताना, विद्यार्थिनी



