धाराशिव जिल्ह्याच्या विकासावर ब्रेक मारणाऱ्या हातांचा आम्ही पडदा फाटेस्तोवर पाठपुरावा करतोय, आणि म्हणूनच काहींच्या बुडाला आग लागली आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः सांगितले — जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या कामांना स्थगिती भाजप आमदार राणा पाटील यांच्या तोंडी तक्रारीमुळे मिळाली! आम्ही ही बाब ठणकावून सांगितली, कारण धाराशिवच्या जनतेला सत्य जाणण्याचा हक्क आहे.
त्याचप्रमाणे शहरातील १४० कोटींच्या रस्त्यांची अडवणूक कोणामुळे झाली, हेही स्पष्ट केलं. कारण विकासाची गती अडवणाऱ्यांचे चेहरे उघडे पडायलाच हवेत.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आ. राणा पाटील यांच्यावर थेट आरोप केले आहेत — ती बातमीही आम्ही निर्भीडपणे छापली. आमचं काम आहे सत्य उघड करणं — कोणाला त्रास झाला तरी!
आता हे छापल्यावर, राणा पाटलांची “पिलावळ” ५० पैशाच्या पगारावर कमेंट करणारी ट्रोल आर्मी सोडतेय — गलिच्छ भाषा, खोट्या पोस्ट, बदनामीचे डाव. पण लक्षात ठेवा —
👉 ही पत्रकारिता नव्हे चाटुकारिता चालणार नाही!
👉 सत्याची मशाल घेऊन आम्ही चालतोय — कोणाच्या ट्रोल आर्मीने आमची वाट अडणार नाही!
मी ३५ वर्षांपासून पत्रकारितेत आहे. कोणाच्या दादागिरीला न घाबरता, आम्ही जनतेच्या बाजूने ठाम उभे राहिलोय. आरसा दाखवतोय — म्हणून जर तुमचं मुखवटे जळत असतील, तर त्यात आमचा काय दोष?
तुम्ही पोस्ट फिरवा, आम्ही तथ्य फिरवतो!
तुम्ही ट्रोल पेरता, आम्ही सवाल विचारतो!
तुम्ही खोटं पसरवा, आम्ही पुरावे ठेवतो!
धाराशिव लाईव्ह ही चविष्ट पेड न्यूजवाल्यांची प्यादीगिरी करणारी मंडळी नाही — आम्ही पत्रकार आहोत, शोषितांच्या बाजूने आवाज उठवणारे. आमच्याविरोधात जो येईल, तो सत्याच्या आगीत जळून खाक होईल.