काय राव! खरं बोललं की इतका त्रास होतो? गेल्या काही दिवसांपासून ‘धाराशिव लाइव्ह’ जे सत्य लोकांसमोर आणत आहे, त्याने जिल्ह्यातील काही तथाकथित ‘महाशक्तीं’च्या पायाखालची वाळू सरकली आहे, हे उघड दिसतंय. आम्ही ३५ वर्षे पत्रकारिता करतोय, लोकांचे प्रश्न घेऊन लढतोय. आम्ही फक्त आरसा दाखवण्याचं काम करतोय, पण त्यात आपलं काळंबेरं दिसल्यावर यांच्या बुडाला आग लागते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
आम्ही काय केलं?
- जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या कामांना नेमकी कोणामुळे स्थगिती मिळाली, हे खुद्द पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. आम्ही फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवलं. यात आमचं काय चुकलं?
- धाराशिव शहरातले १४० कोटींचे रस्ते कोणाच्या आडमुठेपणामुळे रखडले, हे आम्ही पुराव्यानिशी स्पष्ट केलं. सत्य मांडणं गुन्हा आहे का?
- तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी पोलिसांना अधिकृत जबाब दिला. त्यात त्यांनी स्थानिक आमदारांवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी नोंदवलेला जबाब आम्ही प्रसिद्ध केला, यात आमची काय चूक? हा जबाब खोटा असेल, तर पोलिसांनी तो नोंदवलाच कसा?
पण सत्य पचवायची ताकद नसेल, तर काय होणार?
हेच! जे आता होतंय. ज्यांच्या हितसंबंधांना धक्का लागला, त्यांनी आपली भाडोत्री पिलावळ कामाला लावली आहे. ५० पैसे प्रति कमेंटवर पोसलेली ‘ट्रोल आर्मी’ आमच्या बातम्यांखाली येऊन गलिच्छ भाषेत गरळ ओकत आहे. कोण आहेत हे? कुठून येतात हे ५० पैशांचे भाडोत्री सैनिक? यांची लायकी ती काय? यांच्या मालकांना थेट समोर यायची हिंमत नाही, म्हणून या डरपोकड्यांना पुढे केलं जातंय.
आता तर हद्द झाली! आमच्याविरुद्ध एक खोटी, बनावट पोस्ट तयार करून सोशल मीडियावर फिरवली जात आहे. काय सिद्ध करायचंय तुम्हाला यातून? तुमच्या खोटारडेपणाने तुम्ही लोकांच्या नजरेतून आणखी उतराल, एवढंच! असल्या छपरी चाळ्यांनी ‘धाराशिव लाइव्ह’ घाबरणार नाही. असल्या भ्याड हल्ल्यांना आणि तुमच्या ५० पैशांच्या ट्रोलिंगला आम्ही भीक घालत नाही!
आम्ही आरसा आहोत, राहणार!
आम्ही लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध उभे आहोत आणि राहणार. ३५ वर्षांचा अनुभव गाठीशी आहे. जनतेचे प्रश्न मांडणं, हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही आरसा दाखवणारच! त्यात स्वतःचं विद्रूप रूप दिसल्यावर चीड येणं स्वाभाविक आहे, पण म्हणून आरसा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, सत्याचा आवाज दाबला जात नाही.
तुमची ट्रोल आर्मी, तुमची पिलावळ, तुमचे खोटेनाटे आरोप – येऊ द्या! आम्ही इथेच आहोत, निर्भीडपणे उभे आहोत. आम्ही प्रश्न विचारणारच! लोकांसमोर सत्य आणणारच! तुमच्या धमक्यांना आणि दबावाला बळी पडून मूग गिळून गप्प बसणाऱ्यातले आम्ही नाही. हिंमत असेल, तर समोर या! मुद्द्यांवर बोला! हे असले ५० पैशांचे खेळ बंद करा.
धाराशिवची जनता सुज्ञ आहे. कोण खरं बोलतंय आणि कोण फेकलेल्या तुकड्यांवर शेपूट हलवतंय, हे त्यांना चांगलं कळतं. त्यामुळे, भाडोत्री ट्रोलसेनेने खुशाल बोंबलत बसावं, ‘धाराशिव लाइव्ह’ आपलं काम करतच राहणार!
जय हिंद! जय महाराष्ट्र!