धाराशिव: शहरातील समता नगर परिसरातील विसर्जन विहीर ते सुधीर (अण्णा) पाटील डीआयसी रोडपर्यंतच्या रखडलेल्या हॉटमिक्स रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. धाराशिव लाइव्हने या विषयावर बातमी दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
बातमीचा परिणाम – प्रशासनाची तत्परता!
समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे यांनी 16 जानेवारी रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर नगरपरिषदेने 24 तासांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. धाराशिव लाइव्हने या विषयावर आवाज उठवल्यानंतर आज सकाळपासूनच काम सुरू करण्यात आले.
नागरिकांचा प्रतिसाद – “माध्यमांचा दबाव आवश्यक”
शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता प्रशासनाची ही चालढकल यापूर्वीही अनेकदा समोर आली आहे. मात्र, माध्यमांनी आवाज उठवला की प्रशासन तातडीने हालचाल करत असल्याचे चित्र आहे.
रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, हे काम दर्जेदार होणार का? की पुन्हा तात्पुरत्या डागडुजीवरच समाधान मानले जाणार? हा प्रश्न कायम आहे. प्रशासनाच्या कामावर नागरिक आता बारकाईने नजर ठेवून आहेत.