धाराशिव – खासदार किती निष्क्रिय आणि अर्धवटराव आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे. महाविकास आघाडी नव्या उमेदवाराच्या शोधत आहे. त्यामुळेच केवळ पोकळ भाषणबाजीत माहीर असलेल्या अर्धवटरावांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळेच भांबावून गेलेला खासदार महायुतीकडे उमेदवार नाही अशी लोणकढी थाप मारत सुटला आहे. खासदारांनी महायुतीची काळजी करत बसण्यापेक्षा स्वतःची उमेदवारी टिकवता येते का ते पहावे असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी म्हटले आहे.
आपल्या खासदारकीच्या पाच वर्षात मतदारसंघात एकही ठळक काम करता आलेले नाही. मतदार आता जाहीरपणे जाब विचारत आहेत. त्यामुळे नैराश्याने ग्रासले गेलेले खासदार तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेत. मागील पाच वर्षे मन लावून भरीव विकास कामे केली असती तर निष्क्रियपणाचा ठपका कशाला बसला असता. आता पराभव समोर दिसत असल्याने महाविकास आघाडीवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. स्वतःला उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने निष्क्रिय खासदार मीच उमेदवार आहे हे भासवण्यासाठी मतदारसंघात दौरे करत सुटले आहेत. आणि महायुतीला उमेदवार नाही अशी लोणकढी थाप मारत आहेत. जनतेला संभ्रमात टाकण्यासाठी महायुतीच्या उमेदवारीबबत चर्चा न करता स्वतःला उमेदवारी मिळते की नाही याची काळजी करावी असा सल्ला चालुक्य यांनी दिला आहे.
मागील पाच वर्षात अधिकारी व कंत्राटदार यांच्याकडून वसुली करण्यापलीकडे यांचे कर्तृत्व काय? राज्यात यांची सत्ता होती. यांचे नेते मुख्यमंत्री होते. तेंव्हा धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ५०% हिस्सा भरावा यासाठी कधी तोंड उघडले का ? परिणामी प्रकल्प रखडला. जर ठाकरे सरकारकडून त्यांनी एवढी बाब करून घेतली असती तर आतापर्यंत तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर दिसले असते. पहिला टप्पा पूर्ण झाला असता.असे असताना ते याच श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी ठाकरे सरकारने ५० % हिस्सा का दिला नाही याचे उत्तर द्यावे असे आव्हान चालुक्य यांनी दिले आहे.
नरेंद्र मोदींजींच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन आपण खासदार झालात हे विसरू नका. आता तुम्हाला पाडण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज नाही तर आमचा साधा कार्यकर्ता देखील तुमचा पराभव करण्यासाठी पुरेसा आहे. तुमची अकार्यक्षमता व हफ्तेखोरी आणि टक्केवारीच तुम्हाला गाळात घालणार आहे. एक फुकटचा सल्ला देतो स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी माझ्या विरोधात सक्षम उमेदवार नाही अशी थाप मारण्याऐवजी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळते का याची चिंता करा. धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीने जे सर्वे केले त्यात खासदारांच्या निष्क्रियतेचा फटका बसणार असल्याचे लक्षात आल्याने महाविकास आघाडी नवा सक्षम उमेदवार शोधत असल्याची बाब सर्वश्रुत असल्याचे चालुक्य यांनी म्हटले आहे.
महायुतीला माझ्या विरोधात सक्षम उमेदवार देता येईना हेच माझ्या कामाचे यश – ओमराजे निंबाळकर
राज्यातील महायुतीने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली असून धाराशिव लोकसभा मतदार संघात मात्र महायुतीला सक्षम असा उमेदवार शोधताना दमछाक होत आहे. यावरुन मी कार्यक्षम आहे की नाही हे सिध्द होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धाराशिव जिल्हयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय पाठपुरावा करुन मंजुर करुन घेतले. तसेच तुळजापुर धाराशिव रेल्वे मार्गाचे सन 2014 साली घोषणा करुनही रखडलेले काम मार्गी लावून भुसंपादन प्रक्रीया चालू केली आहे. अशाच प्रकारे सोलापुर-उमरगा महामार्गाचे रखडलेले काम देखील अंदोलनात्मक मार्गाने टोलवसुली बंद करुन शिवसेना स्टाइलने चालू करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांच्या दैनंदिन आडचणीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे महावितरणच्या सुधारीत विद्युत वितरण होण्याच्या धोरणात्मक एकुण जिल्हयातील 1303 कोटी रुपयाचा आराखडयाच्या मंजुरीने विद्युत पुरवठयातील येणाऱ्या आडचणी भविष्यात कमी होतील. यासाठी वैयक्तीक पाठपुरावा करुन सुधारीत आराखडा मंजुर करुन घेतला. त्याचबरोबर मतदार संघातील प्रत्येक अडचणीत नेहमी नागरीकांच्या समस्यांना प्रधान्य देवून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व आभासी फसव्या विकासाची स्वप्ने न दाखवता, प्रामाणिकपणे शाश्वत व धोरणात्मक धोरणे मतदार संघातील जनतेसाठी आवश्यक विकासात्मक कार्य नेहमीच चालू आहे व जनतेचा मिळत असलेला प्रचंड प्रतीसाद यामुळेच विरोधकांना आजुणही माझ्या विरोधात सक्षम असा उमेदवार देता आला नाही. असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमरगा तालुक्यातील कोथळी, कंटेकुर, मुरळी, औराद येथील जनसंपर्क दौऱ्यात व्यक्त केले