धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मालाविषयक गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन आरोपींना अटक केली असून, एकूण 12.70 लाख रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, पोअं विनायक दहीहंडे, पोअं प्रकाश बोईनवाड यांनी आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग सुरू ठेवले होते.
दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा क्रमांक 111/2025 कलम 303(2) अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी बेंबळी रोडवर थांबले असल्याचे कळले. पथकाने तत्काळ नमूद ठिकाणी धाव घेतली असता, आरोपी हणुमंत रामा बोडके (वय 24), निखील राजेंद्र मंजुळे (वय 21) आणि अरविंद बाबा क्षिरसागर (वय 21) हे मिळून आले.
प्रारंभी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु अधिक विश्वासाने चौकशी केली असता, त्यांनी शिंदे कॉलेजजवळील वरुडा रोडवरील एका गोडाऊनमधून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून अल्युमिनियम 55 एमएम धातूच्या ताराचे बंडल (एकूण वजन 200 किलो), पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (क्रमांक MH 25 P 3808), बुलेट मोटरसायकल (क्रमांक MH 25 BB 0002) आणि यामाहा मोटरसायकल (क्रमांक MH 25 BD 1165) असा एकूण 12,70,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि पथकातील अन्य सदस्यांनी केली. जप्त माल आणि आरोपी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.