धाराशिव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेत खासदार राजेनिंबाळकर यांचे शून्य योगदान आहे. धादांत खोटे बोलण्यात पटाईत असलेल्या खासदारांनी वैद्यकीय महाविद्यालय आपल्यामुळेच सुरू झाले असल्याचा कांगावा सुरू केला आहे. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. हिंमत असेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी केलेल्या कामाचे पुरावे जनतेला दाखवा अन्यथा तुमचा खोटारडेपणाचा बुरखा जनतेच्या दरबारात पुराव्यासह फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिला आहे.
धाराशिवला स्वतंत्र विद्यापीठ सुरू व्हावे यासाठी नाशिक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची थाप खासदारांनी मारली होती. या समितीत माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, शिक्षणतज्ज्ञ एम डी देशमुख सर, माजी प्राचार्य डॉ. अनार साळुंखे मॅडम यांचा समावेश असल्याचे प्रसिद्धी पत्रक खासदारांनी स्वतःच्या सहिनीशी जारी केले होते. तीन महिन्यात सदर समिती सरकारला अहवाल सादर करणार असल्याची लोणकाढी थाप त्या पत्रकात खासदारांनी मारली होती. वास्तविक पाहता ना त्यांनी यात नावं घेतलेल्या सदस्यांना याची कल्पना होती, ना विद्यापीठाला, ना उच्च व तंत्रशिक्षण खात्याला. अगदी त्याचप्रमाणे आता खासदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्यामुळेच सुरू झाल्याचा कांगावा करीत सुटले आहेत.
मार्च २०१९ मध्ये झालेल्या महाआरोग्य शिबिरात आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वप्रथम याबाबत मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत धाराशिव येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा तत्कालीन वैद्यकीय मंत्री गिरीशजी महाजन यांनी जाहीर केली होती. पुढे विधिमंडळ अधिवेशनात देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील व तत्कालीन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी याबाबत आवाज उठवला होता. त्यावर देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेत धाराशिवकरांच्या महत्वाच्या प्रश्नाची सोडवणूक केली होती.
मात्र विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. आणि नंतर हा विषय अनेक दिवस प्रलंबित राहिला.भाजप नेत्यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला मात्र प्रत्यक्षात महाविद्यालय सुरु करण्यासाठी कोणत्याही आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात ठाकरे सरकारला यश आले नाही की त्यांनी यासाठी कांही केले नाही. त्यासाठी आता थापा मारणाऱ्या खासदारांनी काय प्रयत्न केले ? केले असतील तर त्याचे खरे पुरावे जनतेसमोर मांडण्याची हिंमत दाखवावी.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दि.०७.०३.२०२२ रोजी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधान भवन, मुंबई येथे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, तत्कालीन पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, तत्कालीन पालकमंत्री. शंकराव गडाख यांच्यासह जिल्ह्यातील आमदार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने (NMC) काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पद भरती, जागा निश्चिती व हस्तांतरण, यंत्रसामुग्री व फर्निचर खरेदी तसेच प्रयोगशाळा उभारणे याबाबत सविस्तर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले होते. या नुसार बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने एक आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र अनेकवेळा पाठपुरावा करून देखील बैठक तर घेण्यात आलीच नाही, परंतु बैठकीचे इतिवृत्त देखील आजवर उपलब्ध करून देण्यात आले नाही. आयोगाच्या निकषाप्रमाणे तयारी न करता समिती बोलावण्यात आली व त्यांनी अनेक गंभीर त्रुटी त्यांच्या अहवालात निदर्शनास आणून दिल्या. या त्रुटींची पूर्तता न केल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने (NMC) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी नाकारली.
युती सरकार सत्तेत आल्यापासून या त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात आली व अधिकांश त्रुटींची पूर्तता देखील झाली आहे. या अनुषंगाने दि ०५/०९/२०२२ रोजी त्रुटी पूर्ततेचा अहवाल राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (NMC) दाखल करण्यात आला. सदरील अहवालाच्या अनुषंगाने फेर तपासणी करण्यात आली व धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेची (NMC) मान्यता मिळाली व शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली.
ज्यावेळी NMC ने ठाकरे सरकारने पाठवलेला अपूर्ण प्रस्ताव नाकारला.प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी NMC च्या निकषांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिति व इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते त्यावेळी खोटे बोलण्यासाठी माहीर असलेल्या खासदारांनी नेमकं काय केलं ? महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा निर्मिती करण्यासाठी नेमकं काय केले ? यात आपलं नेमकं योगदान काय आहे? दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धादांत खोटे बोलणाऱ्या खासदार महाशय खरेखुरे पुरावे जनतेसमोर देण्याची हिम्मत करतील का? असेही नितीन काळे यांनी म्हटले आहे.