धाराशिव: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या झाली. त्यांच्या कुटुंबाला मदत करायचीआहे, असे सांगून आष्टीचे आ, सुरेश धस यांचा धाराशिवमधील खासगी पीए आशिष विशाळ हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खंडणी मागत होता. त्याला मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा कार्यकर्त्यांनी आज धो – धुतले. त्यानंतर त्याचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत
या भामट्याने आमदार सुरेश धस यांचे बनावट लेटरपॅड वापरून, त्यावर खोटी सही करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर, ‘चौकशी लावतो, अडचणीत आणतो’ असा दम देत लाखोंची खंडणी उकळण्यात आली.
‘सत्तेचा’ बनावट धाक!
या भामट्याने आधी अधिकाऱ्यांविरुद्ध बनावट तक्रारी देऊन चौकशी लावली. त्या चौकशीच्या भुंग्यांचा दबाव वाढताच, संबंधित अधिकाऱ्यांना ‘डील’चा प्रस्ताव द्यायचा. “बाहेर सेटल करा, नाहीतर मोठी कारवाई होईल” अशा धमक्या देत पैशांची वसुली केली जात होती.
खंडणीच्या पैशातून आलिशान गाडी आणि कोटींची ठेव!
या भामट्याने धाराशिवचे माजी मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्याविरुद्ध तक्रारी देऊन प्रचंड खंडणी उकलली होती. तसेच पूजा प्रसाद पाटील बांधकाम प्रकरणी देखील मोठी डील केली होती.
या पद्धतीने शासकीय यंत्रणेवर दबाव टाकून लाखोंची कमाई करणाऱ्या या भामट्याने १८ लाखांची गाडी खरेदी केली आणि एका खासगी बँकेत तब्बल २ कोटींची ठेव जमा केली आहे!
आ. सुरेश धस यांचा संताप – ‘हा गुन्हा गाजवणार!’
या संपूर्ण प्रकाराने संतापलेल्या आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “या भामट्याने माझे नाव, लेटरपॅड आणि सहीचा गैरवापर केला आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी त्याच्या कॉल रेकॉर्ड, बँक डिटेल्स आणि सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी.
सरकारी अधिकारी, कर्मचारी हुशार!
या घटनेनंतर जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सावध झाले असून, कोणत्याही संशयास्पद पत्रावर विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
‘खंडणीबाजांचा’ खेळ संपणार?
पोलिस तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का? आणखी किती अधिकाऱ्यांना गंडवले गेले आहे? याचा उलगडा लवकरच होईल.