धाराशिव: केवळ दहा हजार रुपयांसाठी आपल्या अडीच वर्षांच्या पोटच्या मुलाला विकल्याच्या धक्कादायक प्रकरणात अखेर मुलाच्या आईसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूम (ता. उमरगा) पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचे मुख्य सूत्रधार चाळीसगाव येथील असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पीडित बालक आजारी असून, त्याच्यावर सध्या धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आईनेच विकले पोटचे बाळ
या प्रकरणात बालकाची आई, करुणा अमोल तळभंडारे, हीच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तिने चाळीसगाव येथील गोकुळ चौधरी याच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यानंतर आपली मामी यशोधरा गायकवाड हिच्या मदतीने तिने मुलगा शुभम याला उज्ज्वला आणि बाळू कांबळे या दाम्पत्याला दहा हजार रुपयांमध्ये विकले. ही संपूर्ण विक्री केवळ १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर करारनामा करून बेकायदेशीर दत्तकविधानाच्या नावाखाली पार पाडण्यात आली.
आजी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठपुरावा
बालकाची आजी लता तळभंडारे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, सुरुवातीला पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल, दौसाली भोसले आणि युवराज डावरे यांनी या प्रकरणात पाठपुरावा केला. अखेर बालकल्याण समितीने (CWC) या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर मुरूम पोलिसांनी कारवाई केली.
या सात जणांवर गुन्हा दाखल
- करुणा अमोल तळभंडारे (पीडित बालकाची आई)
- यशोधरा दिनेश गायकवाड (आईची मामी)
- उज्ज्वला बाळू कांबळे (बालकाला विकत घेणारी महिला)
- बाळू शिष्य कांबळे (बालकाला विकत घेणारा पुरुष)
- सुधीर ढेपे
- लक्ष्मी नागनाथ गायकवाड
- गोकुळ चौधरी (आईचा दुसरा पती, रा. चाळीसगाव)
बालकाची प्रकृती चिंताजनक, पोलिसांवरही आरोप
विक्री करण्यात आलेला बालक शुभम याला ताप आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सध्या बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली असून, समितीने त्याची आजी लता तळभंडारे यांची तात्पुरते ‘केअर टेकर’ म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान दहिफळे यांनी गैरवर्तणूक देत आजी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना खोलीत डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. पवार यांच्या हस्तक्षेपानंतर जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणी दहिफळे यांच्यावर कारवाई करावी आणि पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.