धाराशिव: शहरातील शाहुनगर परिसरात एका घरात घुसून आई-मुलावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दत्ता सोखंडे, सोन्या गळकाठे, ओम जाधव आणि इतर १० जणांनी मिळून योगेश सुरेश डांगे (२८) आणि त्यांच्या आईला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
घटना २० जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींनी योगेश डांगे यांच्या घरात घुसून त्यांच्या आईवर मोबाईल चोरीचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी आई-मुलावर हल्ला केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात योगेश डांगे आणि त्यांची आई गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी योगेश डांगे यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ११७(२), ११८(१), ३३३, ११५(२), ३५१(२)(३), ३(५) सह अ.ज.जा.प्र.अधि कलम ३(१),(आर),(एस), ३ (२) (व्ही.ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
धाराशिवमध्ये भांडण सोडवण्याच्या कारणावरून मारहाण
धाराशिव: रामनगर येथील कबीर बाबु सय्यद यांनी राहुल महादेव कोळी यांना भांडण सोडवण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता जनाई मंगल कार्यालयाजवळ सांजा रोडवर घडली.
राहुल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कबीर सय्यद यांनी त्यांना मारहाण करून ढकलून दिले. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, सय्यद यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी राहुल कोळी यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी वैद्यकीय जबाब दिला असून, आनंदनगर पोलीस ठाण्यात कबीर सय्यद यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२),(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.