धाराशिव – जिल्ह्यातील विद्युत वितरण प्रणालीमधील सर्व प्रस्तावित कामांचा आढावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या कामांना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती.
सुधारित विद्युत वितरण प्रणाली अंतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी नविन 33/11 के.व्ही.ए. उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये वाडीवस्तीकरीता सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी नविन ट्रान्सफार्मर मंजूर केले आहेत. तसेच लघु विद्युत वाहिणी तारा, 11 के.व्ही.ए. आणि 33 के.व्ही.ए. तारा बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. नविन 11 के.व्ही.ए. आणि 33 के.व्ही.ए. लाईन टाकणे, फिडर सेफरेशन, कॅपॅसिटर बँका, क्षमतावाढ आणि अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम देखील सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता आवळेकर यांनी दिली.
सुधारित विद्युत वितरण प्रणाली अंतर्गत संथ गतीने सुरु असलेल्या कामांना जलद गतीने आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आवळेकर, कार्यकारी अभियंता गुजर, कार्यकारी अभियंता कुलकर्णी मॅडम, अशोक बिल्डकॉन नाशिक व नागार्जुन कंन्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.