धाराशिव – नगरपरिषदेच्या हद्दीतील मिळकत क्रमांक ४१२७ मध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने गुरुवर्य के. टी. पाटील यांचा विनापरवाना उभारलेला पुतळा हटवण्याच्या कारवाईला आनंदनगर पोलिसांनी ६ ऑगस्ट रोजी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यास नकार दिला होता, त्यामुळे पुतळ्यावरील कारवाई लांबणीवर पडली आहे.
नगरपरिषदेने ६ ऑगस्ट रोजी पुतळा हटवण्याची कारवाई करण्याचे नियोजित केले होते. मात्र, पोलिसांनी राज ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुरेसा बंदोबस्त पुरवू शकणार नसल्याचे कळवले आहे.पोलिसांनी दिलेल्या उत्तरामुळे पुतळा हटवण्याची कारवाई लांबणीवर पडली आहे.
आता नगर परिषदेने आनंदनगर पोलिसांच्या दालनात चेंडू टाकला आहे., पोलीस बंदोबस्त कधी पुरवणे शक्य होईल, याची तारीख द्यावी, जेणेंकरून यंत्रणा उभी करण्यात येईल , असे पत्र नगर परिषदेने पोलिसाना लिहिले आहे.
काय आहे प्रकरण ?
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने धाराशिव शहरात गुरुवर्य के. टी. पाटील यांचा पुतळा उभारला आहे . मात्र, हा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आल्याचे समोर आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने 25 जुलै रोजी मुख्याधिकारी वसुधा फड यांना पुतळा हटवण्याचे आदेश दिले होते. तसेच, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरही मुख्याधिकारी वसुधा फड यांनी पुतळा हटवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यानंतर फड यांना प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यानी देताच, फड यांनी ६ ऑगस्टला पुतळा काढण्याचे पत्र दिले होते. मात्र या दिवशी पोलीस मॅनेज झाल्याने कारवाई टळली आहे.