धाराशिव – धाराशिव नगर पालिका सध्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराने गाजत आहे. पालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर एकूण आठ गुन्हे तर लेखापाल सूरज बोर्डे यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. एकूण सात ते आठ पालिका अधिकारी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणात गुंतले आहेत. आता मोजमाप पुस्तिका २०१ व २०३ वरून नवा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
धाराशिव पालिकेतील लेखा विभागातील २०१ व २०३ ही मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याची तक्रार न. प. कर्मचारी वैजनाथ द्रुकर यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. ही तक्रार पोलिसांनी एनसी म्हणून नोंदवून घेतली आहे. पण या मोजमाप पुस्तिकेला पालिकेतून पाय कसे काय फुटले ? असा प्रश्न विचारला जात आहे.
शहरातील विविध बोगस कामाची २०१ व २०३ ही मोजमाप पुस्तिका जाणीवपूर्वक गायब करण्यात आली आहे. पावणे तीन कोटी रुपयाची रस्त्यांची, नाल्याची बोगस कामे दाखवून बिल उचलण्यात आले आहे आणि खोटी बिले जोडण्यात आली आहेत. पालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणे उघडकीस येताच, ही मोजमाप पुस्तिका गायब करून, पुस्तिका गहाळ झाल्याची तक्रार दि. ४ ऑगस्ट रोजी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.
ही पुस्तिका २ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२. ३० गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार १० महिन्याने उशिरा दाखल का केली ? तसेच मुख्याधिकारी वसुधा फड या जानेवारी २०२३ मध्ये जॉईन झाल्या असताना , मोजमाप पुस्तिका २ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२. ३० गहाळ झाल्याचा शोध त्यांनी कसा काय लावला ? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
ही मोजमाप पुस्तिका जाणीवपूर्वक गायब करून गहाळ झाल्याची खोटी फिर्याद देण्यात आली आहे. २०१ व २०३ मोजमाप पुस्तिका गायब करून भ्रष्ट्राचार करणाऱ्याचे पाप लपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मोजमाप पुस्तिका चोरीला नेवून किंवा गायब करून दोषींना वाचवण्यासाठी मुख्याधिकारी वसुधा फड या प्रयत्न करीत असल्याची तक्रार आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकारीकडे केली असून, या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.