धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील बोगस गुंठेवारी प्रकरणी निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांच्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैकी तीन आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात एकूण १३१४ गुंठेवारी फाईल्स मंजूर झाल्या असून पैकी १३४ बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी करून लेआऊट मंजूर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकरणात भूखंडाचे सर्व्हे मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसल्याने व काही प्रस्तावामध्ये कच्चा रेखांकन नकाशा नसल्याने मंजूर विकास योजनेमध्ये प्रस्तावाअंतर्गत भूखंडाचे निश्चित होत नाही. तसेच काही संचिकांमध्ये मूळ मालक यांच्याकडील क्षेत्रामध्ये १० टक्के जागेचे क्षेत्र हस्तांतरित न करता गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.
तसेच रद्द केलेल्या रेखांकन प्रस्तावास मंजुरी देणे, बांधकामाचे विकास शुल्क न आकारणे, मूळ मालकाचे नावे गुंठेवारी करणे, खरेदीदार व्यक्तिरिक्त इतरांचे नावे गुंठेवारी करणे, भोगवटदार वर्ग २ चे जमिनीचे विभाजन करून गुंठेवारी करणे, बेकायदेशीर बांधकाम नियमित करणे, बांधकामाचे अधिमूल्य न आकारणे, विकास शुल्कात ५० टक्के सवलत देणे आदी गैरव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच गुंठेवारी नियमाधिन केलेल्या परवानगीची प्रत जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास पाठवण्यात आली नाही. काही प्रस्तावात ५० टक्के सूट देण्यात आली असली तरी उर्वरित रक्कम देखील नगर पालिकेत जमा झाली नाही.
याप्रकरणी निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांच्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा भादंवि ४०९,१६६ ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैकी येलगट्टे, विधाते आणि कवडे यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. ए. बागे – पाटील यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. आरोपीच्या वतीने ऍड. विशाल साखरे यांनी काम पाहिले.