कळंब – कळंब शहरातील एका व्यापाऱ्याच्या गोडावूनमधून ४५ पोते सुपारी चोरीस गेली होती, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावून दोन चोरट्याना अटक केली आणि २३ पोते माल जप्त केला, परंतु नंतर जप्त केलेल्या मालाला पाय फुटल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.
काय आहे तक्रार ?
फिर्यादी नामे- महादेव मनोहरराव घुले, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब, जि. धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता. कळंब येथील सुपारीचे गोडवुनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.12.2023 रोजी 05.00 ते दि. 02.12.2023 रोजी 07.00 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन गोडावून मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16,60,125 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव घुले यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे गुरनं 506/2023 कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन आरोपीना अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावून याप्रकरणी दोन चोरट्याना अटक केली. दोन आरोपी कल्पनानगर पारधीपिढी येथे लपून बसले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून आरोपी नामे-1) शंकर मच्छिंद्र काळे, 2) श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार दोघे रा. कल्पानगर, पारधी पिढी, कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना दि. 03.12.2023 रोजी कल्पना पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन अधिक विचारपूस करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी यांचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला पैकी सुपारीचे 23 पोते,6,95,175 ₹ व निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर हेड क्र एमएच 13 BR 2587 असा एकुण 9,95,175 ₹ चा मुद्देमाल जप्त केला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातीला २३ पोते जप्त केले होते. नंतर २२ पोते जप्त केले परंतु त्यातील काही पोते परस्पर विकल्याची चर्चा सध्या सुरु आहे आयपीएल प्रकरणी लाखो रुपये कमाई करणाऱ्या पोलिसांनी सुपारी चोरी प्रकरणी चांगलीच कमाई केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
एका आरोपीची आत्महत्या
या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता पवार याने आत्महत्या केली आहे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी छळ केल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, प्रेत कळंब पोलीस स्टेशनमध्ये आणून, जोपर्यंत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंतविधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.दत्ता पवार जवळील माल पोलिसांनी विकल्याची चर्चा सुरु आहे.