धाराशिव – धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर पालिकेतील मोजमाप पुस्तिका २०१ व २०३ प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या फाईल चोरी प्रकरणी आता कुणाला अटक करणार की केवळ गुन्हा नोंदवून शांत बसणार, याकडे लक्ष वेधले आहे.
धाराशिव पालिकेतील लेखा विभागातील २०१ व २०३ ही मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याची तक्रार न. प. कर्मचारी वैजनाथ द्रुकर यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. ही तक्रार पोलिसांनी एनसी म्हणून नोंदवून घेतली होती. या मोजमाप पुस्तिकेला पालिकेतून कसे काय पाय फुटले ? असा प्रश्न धाराशिव लाइव्हने उपस्थित करून, याबाबतचे वृत्त दि ५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच, पालिका मुख्याधिकारी वसुधा फड ताळ्यावर आल्या आणि त्यांनी पूर्वीचेच फिर्यादी वैजनाथ द्रुकर यांच्याकरवी मोजमाप पुस्तिका २०१ व २०३ प्रकरणी चोरीची तक्रार आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
धाराशिव नगर पालिकेतील मोजमाप पुस्तिकेला फुटले पाय …
आनंदनगर पोलिसांनी यापूर्वी गहाळ झालेला एनसी गुन्हा आता दखलपात्र करून भादंवि ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर हे पालिकेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी जे गुन्हे दाखल झाले, त्यात कोणतीही कारवाई न करता, वाहत्या पाण्यात हात धुवून घेण्याचे काम केले आहे. त्यामुळे हाही गुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करावा, अशी मागणी आहे, तसेच बांगर यांनी पालिका गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी जे गुन्हे दाखल झाले त्याचा काय तपास केला ? याचा आढावा घेऊन,त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
त्या फाईलमध्ये नेमकं दडलंय काय ?
शहरातील विविध बोगस कामाची २०१ व २०३ ही मोजमाप पुस्तिका जाणीवपूर्वक गायब नव्हे चोरी करण्यात आली आहे. पावणे तीन कोटी रुपयाची रस्त्यांची, नाल्याची बोगस कामे दाखवून बिल उचलण्यात आले आहे आणि खोटी बिले जोडण्यात आली आहेत. पालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणे उघडकीस येताच, ही मोजमाप पुस्तिका गायब करून, पुस्तिका गहाळ झाल्याची तक्रार दि. ४ ऑगस्ट रोजी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती.
ही पुस्तिका २ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२. ३० गहाळ झाल्याचे यापूर्वीच्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रार १० महिन्याने उशिरा दाखल का केली ? तसेच मुख्याधिकारी वसुधा फड या जानेवारी २०२३ मध्ये जॉईन झाल्या असताना , मोजमाप पुस्तिका २ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२. ३० गहाळ झाल्याचा शोध त्यांनी कसा काय लावला ? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
ही मोजमाप पुस्तिका चोरी करण्यात काही राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे. त्यात अनेक पालिका अधिकारी आणि कर्मचारी गुंतले आहेत. या सर्वाना फाईल चोरी प्रकरणी अटक होणार का ? हा आमचा सवाल आहे.
पहिली तक्रार
दुसरी तक्रार