तुळजापूर: जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पोलिसांनी अवैध गांजा जप्तीची मोठी कारवाई केली आहे. ज्ञानप्रभा लॉजजवळील एका शेडमध्ये छापा टाकून पाच किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला असून, गणेश अनिल घाटशिळे (वय २३, रा. सिंदफळ) यास अटक करण्यात आली आहे.
गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (दि. २६) सायंकाळी ही कारवाई केली. घाटशिळे हा पांढऱ्या रंगाच्या पोत्यात ५ किलो ४३५ ग्रॅम वजनाचा गांजा बाळगून असल्याचे आढळून आले. तो हा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता असा पोलिसांचा अंदाज आहे.
घाटशिळे विरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक खांडेकर, सपोनि भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.