नागपूर – धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचारआणि गैरव्यवहाराचा पाढा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज विधान परिषदेत वाचला. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे हे मागील सहा महिन्यापासुन जेलमध्ये हवा खात आहेत तर विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असे सांगून या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करणार का ? असा प्रश्न विचारला असता,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली.
धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार धाराशिव लाइव्हने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती, तसेच मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल झाले असून, मागील सहा महिन्यापासून ते जेलची हवा खात आहेत तसेच लेखापाल सूरज बोर्डे यास २७ कोटीच्या गुन्ह्यात काही दिवसापूर्वी अटक झाली असून, तेही जिल्हा कागागृहात बंदिस्त आहेत.
विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड या मागील काळात झालेला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असा आरोप आ. सुरेश धस यांनी केला असून, त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.
धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर पालिकेतील मोजमाप पुस्तिका २०१ व २०३ प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी गहाळ झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. यामागे वसुधा फड यांचा हात असल्याचा आरोप आ. धस यांनी केला आहे.
आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांनी पालिका भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर तपास न करता, आरोपीना पाठीशी घातले, त्यामुळे त्यांना निलंबित करावे, अशी देखील मागणी धस यांनी केली आहे. बांगर यांनी फड यांना तर फड यांनी बांगर यास साथ दिली, असा आरोप आमदार धस यांनी विधान परिषदेत केला.