धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात नागपुरात केली होती. त्यानंतर आ. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटीच्या अध्यक्षपदी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी केली.त्यावर फडणवीस यांनी डॉ. गेडाम यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे धाराशिवमधील भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा पाढा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत वाचला होता. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे हे मागील सहा महिन्यापासुन जेलमध्ये हवा खात आहेत तर विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असे सांगून या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करणार का ? असा प्रश्न विचारला असता,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
त्यानंतर आ. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटीच्या अध्यक्षपदी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी करणारे निवेदन दिले. .त्यावर फडणवीस यांनी डॉ. गेडाम यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असून, तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी स्थापन होणाऱ्या एसआयटीच्या अध्यक्षपदी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
डॉ. प्रवीण गेडाम हे यापूर्वी धाराशीवचे जिल्हाधिकारी म्हणून उत्तम काम केले आहे. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत. त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून जनतेने प्रत्येक ठिकाणी आंदोलने केली आहेत.
२००२ मध्ये महाराष्ट्राच्या तुकडीतून ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. २००५ मध्ये जळगाव महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी राज्यभर चर्चेचा विषय ठरली.जळगावच्या घरकुल योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे श्री. गेडाम यांनी शोधून काढले. त्यांनी स्वतः पोलिसांकडे १४ पानांची तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा खटला तेरा वर्षे चालू होता. या प्रकरणात तत्कालीन आमदार सुरेश जैन यांच्यासह अनेकांना तुरुंगवास झाला होता.
एसआयटीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाल्यास धाराशिव नगर पालिकेत जो प्रचंड घोटाळा झाला आहे, त्याचे खरे सूत्रधार बाहेर येण्याची शक्यता आहे. जळगावचे तत्कालीन आमदार सुरेश जैन यांच्याप्रमाणे धाराशिवमधील कोणते लोकप्रतिनिधी जेलमध्ये जाणार ? याकडे आता लक्ष वेधले आहे.