लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. इंडिया आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी ‘फिक्स’ असली तरी महायुतीकडून दादा की ताई रिंगणात उतरणार , याबाबत जिल्हाभरात औत्सुक्य निर्माण झाले आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा, भूम-परंडा या चार विधानसभा मतदारसंघाचा तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
तुळजापूर ( राणा जगजितसिंह पाटील ) , औसा ( अभिमन्यू पवार) आणि बार्शी ( राजेंद्र राऊत ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे , उमरगा-लोहारा ( ज्ञानराज चौगुले ) भूम-परंडा ( तानाजी सावंत ) या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर धाराशिव-कळंब ( कैलास पाटील ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. एकंदरीत रागरंग पाहता महायुतीचे पारडे सध्या जड आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत फूट नव्हती. भाजप आणि शिवसेना मजबूत होती. राजकारणातून बाहेर पडलेले ओमराजे निंबाळकर यांना मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागली. राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांचा दारुण प्रभाव झाला होता. लोकसभा निवडणुकीत पराभव होताच, राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवून, आमदार म्हणून निवडून आले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय चित्र बदलले आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन भाग झाले आहेत. महायुती म्हणून आ. राणा पाटील, तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले एकत्र आले आहेत. भाजपकडून आ. राणा पाटील हे लोकसभेसाठी फारसे इच्छुक नसले तरी पक्षाने आदेश दिल्यास त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे.
आ. राणा पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील या लोकसभेसाठी इच्छूक असल्या तरी एकाच घरात पक्ष दोन तिकिटे देणार का ? हे एक कोडेच आहे. तसेच भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, नितीन काळे, बसवराज मंगरुळे आदींनी देव पाण्यात ठेवले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड हे इच्छूक असून, धाराशिवची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
सध्या देशात अयोध्या श्रीराम मंदिरामुळे इंडिया आघाडीच्या उमेदवारांना ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली आहे. मोदीची गॅरंटी लोकांना पटल्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड राहणार आहे.बदललेली हवा पाहून शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर हे लोकसभेसाठी फारसे इच्छूक नाहीत. धाराशिवची लोकसभेची जागा काँग्रेसला देऊन, स्वतः धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात उभे राहण्याची त्यांची तयारी आहे. पण आ. कैलास पाटील यांनी शिवसेना फुटीच्या वेळी दाखवलेली निष्ठा ओमराजेंना आड येत आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना त्यांना लोकसभेसाठी उभे राहावे लागणार आहे.
काँग्रेसकडून माजी आमदार बसवराज पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक असले तरी इंडिया आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता फार कमी आहे. बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या मागील काही दिवसापासून उठल्या आहेत. परंतु तश्या कोणत्याही हालचाली सध्या दिसत नाहीत. बसवराज पाटील यांना भाजपमध्ये घेण्यास आ. राणा पाटील यांचा कडाडून विरोध आहे तसेच भाजपची मंडळी बसवराज पाटील यांना स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे बसवराज पाटील हे भाजपमध्ये जाणार ही अफवाच ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली, त्यात समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. लवकरच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. इंडिया आघाडी मात्र अद्याप सामसूम आहे.काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा जनसंपर्क तुटला आहे. बसवराज पाटील उमरगा सोडून जिल्ह्यात फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर एकाही पडले आहेत.