धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साठे यांनी नामंजूर केला आहे. त्यामुळे येलगट्टे यांचा जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर येलगट्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. त्याची सुनावणी नोव्हेंबर महिन्यात झाल्यानंतर खंडपीठाने चार्जशीट दाखल झाल्यानंतर संबंधित न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल करावा, असे निर्देश दिले होते.
त्यानंतर पोलिसांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात चार्जशीट दाखल केल्यानंतर येलगट्टे यांनी ऍड. विशाल साखरे यांच्या मार्फत नव्याने जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साठे यांनी देखील अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे येलगट्टे यांचा जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
काय आहे प्रकरण ?
आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.