धाराशिव: बहुप्रतिक्षित धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीचे आरक्षण आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी चार तालुक्यांमध्ये महिलांना सभापतीपद भूषवण्याची संधी मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया शांततेत पार पडली. या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आगामी काळात होणाऱ्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर या आरक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जाहीर झालेले तालुका निहाय सभापती आरक्षण खालीलप्रमाणे:
- धाराशिव: सर्वसाधारण महिला
- कळंब: सर्वसाधारण महिला
- परंडा: सर्वसाधारण महिला
- वाशी: इतर मागासवर्गीय (OBC) महिला
- भूम: सर्वसाधारण पुरुष
- तुळजापूर: सर्वसाधारण पुरुष
- लोहारा: इतर मागासवर्गीय (OBC) पुरुष
- उमरगा: अनुसूचित जाती (अ.जा.) पुरुष
लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार असून त्यानंतर सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.