धाराशिव – विश्वासघात ही काँग्रेस पक्षाची एकमेव ओळख आहे. काँग्रेस 60 वर्षे सत्तेत होते मात्र, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवू शकले नाही. मराठवाडा वॉटर परियोजनाला कोणी थांबवले? जलयुक्त शिवार योजनेला कोणी थांबवले होते? ज्यांनी तुमचे पाणी थांबवले त्यांना तुम्ही मतदान करताल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिवच्या जाहीर सभेत उपस्थित केला. मोदी अडचणी टाळत नाही, तर त्या अडचणींचा सामना करतो. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणे आणि प्रत्येक क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवणे हे मोदीचे मिशन असल्याचे देखील ते म्हणाले. आता तर केवळ दहा वर्षे झाले आहेत. दहा वर्षात पाण्यासाठी आम्ही जेवढे काम केले, तेवढे काम साठ वर्षे देखील काँग्रेस करू शकले नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
आई तुळजाभवानी आणि जनतेच्या आशीर्वाद घेण्यासाठी मी धाराशिव मध्ये आलो असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. विकसित भारतासाठी शक्तिशाली भारतासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पूर्वी देशात आतंकवादी हल्ला करून पळून जात होते. काँग्रेस सरकार रडत बसत होती. जगभरात वाचवा वाचवा करत फिरत होती. प्रत्येक जण भारताकडे डोळे मोठे करून पाहत होता. आणि त्या काळात काँग्रेस सरकार ‘अमन की आशा’ असा राग आळवत होती. जे सरकार स्वतः कमजोर असेल, ते सरकार देशाला कशाप्रकारे मजबूती देतील? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी धाराशिव मधील मतदारांना विचारला. कमजोर सरकार मजबूत देश बनवू शकते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी अर्चना पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले.धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ज्वारीला आता श्रीअन्न म्हणून आम्ही नवीन ओळख दिली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जगातील प्रत्येकाच्या ताटापर्यंत ज्वारी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील राष्ट्रपतींनी मला काही दिवसांपूर्वी जेवणाला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या व्हाईट हाऊस मध्ये त्यांनी माझ्यासाठी मोठी पार्टी आयोजित केली होती. भारतीय पंतप्रधानासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सर्वात महत्त्वपूर्ण आणि मजेशीर गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्या दिवशी रात्री जेवताना सर्वांसाठी श्रीअन्न म्हणजेच ज्वारीची भाकरी जेवणासाठी ठेवली होती, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.