धाराशिव – धाराशिव शहरात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांची कत्तलीच्या उद्देशाने नेणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने आज, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी ही धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये १७ जिवंत गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार राऊत यांच्या पथकाला शहरात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून एक आयशर टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता, त्यात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे कोंबलेली १७ जिवंत गोवंशीय जनावरे आणि ४६० किलो गोवंश मांस आढळून आले.


याप्रकरणी समीर मिया शेख (रा. दर्गा रोड, धाराशिव) व इतर तिघांना आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार हुसेन सय्यद यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ४८५/२५ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(क), ५(ड), ९, ९(अ) आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पो.ह. हुसेन, संदीप, गरड, पो.ना. पाटील, पो.अं. अनिल, ठाकूर, चा.पो.ह. लाटे यांच्या पथकाने केली. त्यांना धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे सपोनि जाधव व इतर अंमलदारांनी सहकार्य केले. या घटनेमुळे शहरात अवैध कत्तलखान्यांचा आणि गोवंश तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







