धाराशिव: शहरात रविवारी आठवडी बाजाराची लगबग असते, भाजीपाल्याची देवाणघेवाण सुरू असते. पण याच गर्दीचा फायदा घेत शहर पोलीस ठाण्यातील काही महाभागांनी चक्क कायद्याचाच बाजार मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैध दारूच्या बॉक्सने भरलेली रिक्षा अडवून कारवाई करण्याऐवजी, एका केळीच्या गाड्यावर १० हजार रुपयांची ‘सेटलमेंट’ झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
नेमका प्रकार काय?
भर बाजारात अवैध दारू वाहून नेणारी एक रिक्षा डौलात निघाली होती. कायद्याच्या रक्षकांनी तिला अडवले. सर्वसामान्यांना वाटले की आता खाकीचा धाक दिसेल, गुन्हा दाखल होईल. पण झाले भलतेच! कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी “तेरी भी चुप आणि मेरी भी चुप” म्हणत वाटाघाटी सुरू झाल्या.
केळीच्या गाड्यावरचा ‘सौदा’
या ‘तोडपाणी’ नाट्यात मुख्य भूमिका बजावली ती एका ‘ड्रेसवाल्या साहेबांनी’ आणि त्यांच्या ‘सिव्हिल ड्रेसमधील पार्टनरने’. मात्र, स्वतःच्या हाताने पैसे घेतील तर ते कसले कसलेले खेळाडू? यासाठी एंट्री झाली ती ‘टी-शर्टवाल्या झिरो’ ची!
बाजारातील एका केळीच्या गाड्याचा आसरा घेण्यात आला. संशय येऊ नये म्हणून १० हजार रुपयांची लाच चक्क एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगखाली लपवून ‘टी-शर्टवाल्या वसुली भाई’ने स्वीकारली. पण, “दिवारों के भी कान होते है” आणि आजकाल तर “मोबाईलला डोळे असतात”. हा सर्व प्रकार एका जागरुक नागरिकानं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि खाकीची ही ‘हातचलाखी’ जगजाहीर झाली.
व्हायरल व्हिडीओतील ‘पात्रे’ (टोपण नावाने):
या सिनेस्टाईल वसुलीत तिघांची केमिस्ट्री दिसून आली आहे:
१. ‘गणवेशधारी पैलवान’ (मुख्य सूत्रधार): हे महाशय अंगावर खाकी वर्दी (पोलीस नाईक) घालून रुबाब झाडत होते, पण लक्ष मात्र ‘गांधी’च्या फोटोवर (नोटांवर) होते.
२. ‘सदाबहार पार्टनर’ (सहाय्यक): साहेबांच्या सोबत सावलीसारखे वावरणारे हे कॉन्स्टेबल महाशय, ज्यांनी या डीलमध्ये ‘बॅकअप’ दिला.
३. ‘टी-शर्टवाला कलेक्टर’ (झिरो पोलीस): खाकीला डाग लागू नये म्हणून हाताचा मळ (लाच) गोळा करण्यासाठी नेमलेला खास खासगी माणूस, ज्याने केळीच्या गाड्यावर सफाईने पैसे उचलले.
धक्कादायक वास्तव:
एकीकडे पोलीस अधीक्षक अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्याचे आदेश देतात, आणि दुसरीकडे त्यांचेच कर्मचारी भर बाजारात अवैध दारूच्या रिक्षा सोडून देण्यासाठी १० हजारांची खंडणी गोळा करतात, याला काय म्हणावे? आता हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर वरिष्ठांकडून या ‘त्रिकूटा’वर काय कारवाई होणार, की हे ही प्रकरण ‘मॅनेज’ होणार? याकडे संपूर्ण धाराशिवचे लक्ष लागले आहे.






