धाराशिव : तामलवाडी नजीक असलेल्या एका लॉजवर सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, धक्कादायक बाब म्हणजे यातील दोन महिला या बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या या महिलांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव पोलिसांना तामलवाडी परिसरातील ‘मिलन लॉज’वर अवैध वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी या लॉजवर अचानक छापा टाकला. धाड टाकल्यानंतर पोलिसांना तिथे तीन महिला आढळून आल्या.
पोलिसही झाले अवाक
ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची प्राथमिक माहिती घेतली असता, त्यापैकी दोन महिला या मूळच्या बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण भागातील एका लॉजवर थेट बांगलादेशी महिला आढळून आल्याने पोलिसही अवाक झाले. जिल्ह्यात परदेशी नागरिकांचा, विशेषतः बांगलादेशींचा असा बेकायदेशीर वावर समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
तपासात भाषेची मोठी अडचण
या दोन्ही बांगलादेशी महिलांना सध्या धाराशिव पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. या महिलांनी सीमा कशी ओलांडली? त्यांना धाराशिवपर्यंत कोणी आणले? यामागे मानवी तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का? यादृष्टीने पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, या महिलांना केवळ त्यांचीच मातृभाषा येत असल्याने पोलिसांना संवादात मोठी अडचण येत आहे. भाषेच्या या अडथळ्यामुळे तपासाचा वेग संथ असला, तरी लवकरच दुभाषिकाच्या मदतीने या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
तामलवाडी पोलिसांच्या आशीर्वादामुळे मिलन लॉजवर अवैध वेश्या व्यवसाय सुरु होता. धाराशिव पोलिसांच्या कारवाईमुळे त्याचा पर्दाफाश झाला झाला आहे.






