धाराशिव – आगामी काळात साजरे होणारे रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती या महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनिवारी (दि. ५ एप्रिल) पोलिसांकडून विशेष रूट मार्च आणि पेट्रोलिंगचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पोलिसांनी हा उपक्रम राबवला.
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित वाटावे, या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला. आनंदनगर पोलीस स्टेशन येथून या रूट मार्चला सुरुवात झाली. पुढे सेंट्रल बिल्डींग चौक, महात्मा बस्वेश्वर चौक, माणिक चौक, जिजाऊ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मार्चाचा समारोप करण्यात आला.
या रूट मार्च आणि पेट्रोलिंगमध्ये ४ पोलीस अधिकारी, ३० पोलीस अंमलदार आणि १० होमगार्ड यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या उपस्थितीमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर सुरक्षा आणि शिस्तीचे दर्शन घडले. या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली.
पोलिसांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या रूट मार्चमुळे शहरात सणासुदीच्या उत्साहासोबतच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.