धाराशिवच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली होती, आणि वातावरण अगदी ‘राजकीय मसाला चित्रपटासारखं’ होतं. गावात प्रत्येक गल्लीत, चहाच्या टपरीवर, आणि किराणा दुकानात राजकारणावर चर्चा तापत होती. या वेळेस निवडणुकीतला ‘तिढा’ हा कुठल्या गुंतवळीसारखा होताच. लोकं तर म्हणत होते की, “ह्या तिढ्याला जर सुटला तर कपडे लावायची वेळ येईल!”
धाराशिवमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती तर समोर काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीची ताकद! या दोन गटांमध्ये इतका गोंधळ चालू होता, जणू काही सिनेमात दोन नायक एकाच नायिकेसाठी भांडत आहेत.
कैलास पाटील, धाराशिवचे विद्यमान आमदार, आणि उद्धव ठाकरे गटाचे ‘शिवसेनेचा वाघ’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिंदे गटाच्या फुटीनंतर ठाकरे यांची एकनिष्ठा राखली, आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद दिला होता, “तू माझा वाघ आहेस!” गावात लोकं म्हणत होती, “वाघ तर आहे, पण कुठेच गुरगुरत नाही, शिकार करणार कधी?”
तिथे दुसऱ्या बाजूला शिवसेना-शिंदे गटाचे सुधीर पाटील आणि शिवाजी कापसे देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून बसले होते. “हे बाप्पा, किमान ह्या जागेवर तरी आमचं नाव लागू दे,” अशी त्यांची आर्जवं होती. पण राजकारणात देवाच्या आरत्या कमी आणि कट-कारस्थाने जास्त लागत असल्याचं त्यांना समजायला उशीर झाला नाही. ऐन शेवटच्या क्षणी हि जागा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विक्रम काळे यांना मिळाली म्हणे.
विक्रम काळे यांचं तर गावात फारच विचित्र स्थान होतं. ते जिल्ह्यात राहत नसत, परंतू लोक म्हणत, “अहो, काय फरक पडतो? शिक्षणाच्या कामात त्यांचा हातखंडा आहे!” पण युट्युब पत्रकारांनी त्यांची पत्रकार परिषद बहिष्कृत केली होती, कारण त्यांचं पॉकेट फारच टाइट होतं. “काय मामा, इतक्या सगळ्या शाळा चालवता, आणि पत्रकारांना चहापाणी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत?” पत्रकारांनी काळेंवर ‘प्रसिद्धीचा बहिष्कार’ टाकून त्यांची बोलती बंद केली होती.
आता काळेंना दोन दोन प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार होता—एक महाविकास आघाडीचे कैलास पाटील, आणि दुसरे त्यांच्याच पक्षातले सुरेश पाटील! गावात लोकं म्हणत होती, “आता पाहा, धिंगाणा होणार! जो जिंकेल, त्याला विजयश्री मिळणार नाही, तर ‘किंमत कमी’ असल्याचा शिक्का मिळणार!”
अखेरच्या दिवशी प्रचारात जोरदार उधाण आलं. युट्युब पत्रकार चुकून एखादी ‘मोफत बाईट’ घेतील का अशी आशा लोकं करत होते. काळेंचा प्रश्न होता, “हे कार्यकर्ते फुकट प्रचार करतील का?” कारण सगळ्यांना माहीत होतं, की प्रचारात पैसे लागतात, आणि पत्रकारांना तर खास किमान ५०० ते १००० रुपये द्यावे लागतात. शेवटी काळेंना विचार पडला, “हे काय, आपण शाळेतल्या मुलांना मोफत वह्या वाटत होतो, पण इकडे तर बरेच पैसे वाटावे लागणार दिसतंय!”
धाराशिवची ही निवडणूक एकूणच राजकीय सर्कससारखी दिसत होती. कोणाचा कसा गोंधळ उडणार आणि कोण कसा निवडून येणार, हे पाहण्याचं गावकऱ्यांना एक नवा ‘एंटरटेनमेंट शो’ मिळाला होता.
– बोरूबहाद्दर