स्थळ: गावातील पारावर, संध्याकाळची वेळ.
पात्रं:
- पक्या: थोडा हुशार आणि राजकारणाची माहिती ठेवणारा.
- भावड्या: सरळ, साधा शेतकरी, ज्याला राजकारणाचं फारसं कळत नाही.
- पेंद्या: थोडा टवाळखोर आणि कोणत्याही विषयावर आपलं मत मांडायला पुढे असणारा.
(पक्या पारावर बसून मोबाईलमध्ये बातमी वाचत असतो. भावड्या आणि पेंद्या तिथे येतात.)
भावड्या: काय रं पक्या, आज परत काय झालं? मोबाईलमधली कुठली बातमी बघून कपाळावर आठ्या पाडल्यास?
पक्या: अरे भावड्या, काय सांगू… पाच वरिसं झाली आपला जिल्हा देशातल्या मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत बसलाय. अन् आजून बी आपण तिथंच तिसऱ्या नंबरवर खुर्ची टाकून बसलोय. पार इज्जतीचा भाजीपाला झालाय आपला.
पेंद्या: मंग, ह्याला जबाबदार कोण? जे सत्तेत बसलेत तेच असणार की!
पक्या: तसंच हाय! सगळा खेळ आपल्या आमदार राणादादांचा हाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे कान फुंकून जिल्हा नियोजन समितीचे २६८ कोटी रुपये अडकवून ठेवलेत.
भावड्या: अरे देवा! म्हणजे जिल्ह्याच्या विकासालाच कात्री लावली की ह्यांनी.
पक्या: थांब की रं… पुढं ऐक. राणादादांनी हे केलं, तसा जिल्ह्याचा पालकमंत्री प्रताप सरनाईक बी चिडला. त्यानं रागारागात आपल्या शहरातल्या रस्त्यांसाठी आलेले १४० कोटी रुपये अडवले. म्हणजे, एकाच्या आडवतेपणामुळं सगळ्यांनीच जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलंय. ह्यांच्या भांडणात आपलं रगडं व्हायलंय.
भावड्या: खरंय तुझं. आता बघ की, त्या बार्शी-औसा रस्त्याची काय चाळण झालीया. आणि शहरातला तो जिजाऊ चौक ते बोंबले हनुमानाच्या देवळापर्यंतचा रस्ता बघितला का? खड्ड्यात रस्ता हाय का रस्त्यात खड्डा, हेच कळंना झालंय. गाडी चालवायची म्हणजे कमरेचं हाड मोडायची पाळी आलीया.
पेंद्या: म्हणूनच तर आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नागरिक पेटून उठलेत. ७ ऑगस्टला रास्ता रोको करणार आहेत म्हणे. पण ह्यांना काय फरक पडणार हाय? आता नगरपालिकेची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आलीया ना, म्हणून हे राजकारण तापलंय. मतांसाठी एकमेकांना पाण्यात बघायचं आणि आपलं मरण करायचं.
भावड्या: म्हणजे सगळा मतांचा खेळ हाय तर… निवडणूक आली की भांडणं लावायची, कामं अडवायची आणि लोकांची दिशाभूल करायची. आपलं काय, आपलं नशीबच फुटकं. ह्यांच्या राजकारणात रस्ता बी मिळंना झालाय आपल्याला.
पक्या: तेच तर! आपल्याला गृहीत धरलंय ह्यांनी. आता निवडणुकीत येतील पाया पडायला, तेव्हाच ह्यांना जाब विचारायला पाहिजे. नाहीतर पाच वरिसं परत खड्ड्यातनंच प्रवास करावा लागंल. चल रं, नुसता ह्यांच्या नावानं बोंबलून काय व्हणार नाय… डोकं भडकलंय पार!
पेंद्या: मंग, ह्यात नवीन काय हाय? दरवर्षीचीच बोंब हाय ही. पण ह्याला जबाबदार कोण?
पक्या: जबाबदार कोण? अरे, जो सत्तेत बसलाय, तोच जबाबदार! आपले आमदार राणादादा… नुसता रुबाब बघा ‘मित्रा’ संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून. मंत्री नसताना मंत्रिपदाचा तोरा मिरवायचा आणि जिल्ह्याला मागं ढकलायचं. खासदार ओमराजे विरोधात बसून काहीतरी करायला बघत्यात, तर ह्यांना बघवत नाय.
भावड्या: पण आता ते लॉजिस्टिक पार्कचं कायतरी ऐकलंय मी. खासदार ओमराजेंनी गडकरी साहेबांकडून मंजूर करून आणायचं ठरवलंय म्हणे. आता तरी काहीतरी होईल आपल्या कौडगाव एमआयडीसीत.
पक्या: तिथंच तर खरी ग्यानबाची मेख हाय! इकडं ओमराजेंनी घोषणा केली, तर तिकडं राणादादांच्या चेले-चपाट्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला विरोध सुरू केला. म्हणे, “हे निव्वळ अज्ञान आहे.” अरे, जे विरोधात बसून काहीतरी आणायचा प्रयत्न करतायत, त्यांनाच हे शहाणपणा शिकवणार!
पेंद्या: च्यायला! म्हणजे ‘ना खुद करेंगे, ना करने देंगे’ वाला मामला झालाय की हा.
पक्या: तसंच की! अरे, हेच राणादादा गेली पाच वरिसं झालं कौडगाव एमआयडीसीत ‘टेक्निकल टेक्स्टाईल पार्क’ उभारण्याचं स्वप्न दाखवत आहेत. कुठाय तो पार्क? अजून त्याला मंजुरीचा पत्ता नाही. नुसत्या हवेतल्या गप्पा! स्वतःला तर काही जमत नाही आणि दुसरा कोणी जिल्ह्यासाठी काही आणत असेल, तर त्याच्या आडव्या काठ्या घालायच्या.
भावड्या: खरंय तुझं पक्या. सत्तेत बसून जिल्ह्याचं भलं करायचं सोडून, फक्त राजकारण करत बसायचं. ह्यांच्या भांडणात आपली पोरं रोजगाराबिगर फिरत्यात, शेतकरी पाण्याला महाग झालाय. पण ह्यांना काय त्याचं? ह्यांना फक्त आपला इगो महत्त्वाचा.
पक्या: तेच तर! सत्ता बी ह्यांच्याकडं, सगळा सरकारी तामझाम ह्यांच्याकडं, पण जिल्ह्याच्या विकासाच्या नावानं नुसता शिमगा. आणि कोणी विरोधातला माणूस काही करायला गेला की लगेच त्याला विरोध. आपलं नशीबच आपल्या हातानं फोडून घ्यायची सवय लागलीया आपल्याला. चल रं, ह्यांच्या नावानं बोंबलून काय उपयोग… डोकं शांत करू जरा.
(तिघेही वैतागून, राणा पाटलांच्या नावाने शिव्या घालत चहाच्या टपरीकडे निघून जातात.)