धाराशिवच्या राजकीय मैदानात सध्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय, पण हा बिगुल जरा हटके आहे. भाजप – राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या राजकीय रस्सीखेचीत रंगत आली आहे, पण यावेळी राजकारणातही “पाकिट पॉलिटिक्स” आणि “बाईट बिझनेस”ची जोरात हवा आहे.
राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांनी धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, पण तिथे सीन जरा वेगळाच होता. युट्युब चॅनलचे तब्बल २० पत्रकार या परिषदेला “पाकिट” न मिळाल्याच्या निषेधार्थ गैरहजर होते. यांना म्हणे, “काळे साहेब सॅटेलाईट चॅनलवाल्यांना पाकिटं देतात, आम्हाला मात्र उन्हात झुलवत ठेवतात.” हा अन्याय कोणी सहन करणार? मग युट्युब पत्रकारांनी आपली ताकद दाखवायचं ठरवलं.
त्यांनी काय केलं तर काळेंच्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजेच राष्ट्रवादीच्याच सुरेश पाटील यांना तडवळ्यावरून धाराशिवला बोलावलं आणि “काळे साहेबांवर बाईट द्या” असं सांगितलं. पाटीलही कसले कमी! त्यांनी सणसणीत बाईट दिली, आणि मग काय, युट्युब पत्रकारांनी तिला उचलून धरलं. त्यानंतर अँपल हॉटेलमध्ये जंगी पार्टी झाली, पाटील साहेबांनी दिलेला “चहा-समोसा” कुठल्या कुठे…
मात्र दुसऱ्या बाजूला सॅटेलाईट चॅनलवाले काय करत होते? त्यांनी काळेंची बाईट घेतली आणि आपलं पाकिट पक्कं केलं. म्हणतात ना, “राजकारणात सर्व काही जायज असतं!” या सगळ्या नाट्यामुळे धाराशिवची निवडणूक रंगतदार झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, या रस्सीखेचीत विजयी कोण होईल? सॅटेलाईटवाल्यांची बाईट की युट्युबवाल्यांची पार्टी?