धाराशिव – धाराशिव येथे ४ लाख १४ हजार रुपये किमतीची जनावरे क्रूरतेने वाहतूक करताना एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अफताब हाजी कुरेशी हा अशोक लीलँड दोस्त कंपनीच्या पिकअप गाडीतून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता आळणी टी पॉईंट येथील सारंब बार समोर येडशी ते धाराशिव जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५२ रोडलगत डाव्या बाजूला पोलिसांनी वाहतूक तपासणी मोहीम राबवली होती. त्यावेळी अफताब कुरेशी याच्या ताब्यातील एमएच १२ पी क्यु ८११७ क्रमांकाच्या पिकअप गाडीतून ३ जर्सी गायी, ३ वासरे, १ म्हशीचे रेडकु आणि १ हलगड अशी जनावरे आढळून आली. ही सर्व जनावरे दाटीवाटीने कोंबून, दोरीने आवळून बांधून क्रूरतेने वाहतूक केली जात होती.
जनावरांची किंमत ४ लाख १४ हजार रुपये असून ती कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अफताब कुरेशी याला अटक केली. त्याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा कलम ११ (ड) (इ) आणि मोवाका कलम ३९/१९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.