धाराशिव : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाल्याची बातमी येताच, धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष झाला. फटाके फुटले, पेढे वाटले गेले आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. हा सगळा उत्साह पाहून क्षणभर वाटलं की, बिहार जिंकल्यामुळे धाराशिवच्या नळाला आता रोज पाणी येणार आहे!
पण जल्लोष संपताच लोक आपापल्या घरी गेले आणि त्यांनी तांब्या-बादल्या भरून ठेवायची तयारी सुरू केली, कारण पुढच्या आठवड्यात पाण्याचा दिवस होता.
हे आहे धाराशिव… नाव बदललं, पण नशीब नाही. एकही मोठा उद्योग नसलेलं, फक्त सरकारी कार्यालयांवर चालणारं आणि रात्री ९ वाजता ‘गुड नाईट’ म्हणून झोपी जाणारं हे शहर. शनिवारी-रविवारी तर इथे अघोषित संचारबंदी लागते की काय, असा प्रश्न पडतो.आणि अशा या शांत शहरात सध्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे.
शहरात १४० कोटींच्या रस्त्याचं काम सुरू झालं. आधी ते ‘मर्जीतील’ गुत्तेदाराला मिळालं. मग वाढीव बिलं मिळावीत म्हणून ते १८ महिने रेंगाळलं. आता पालिका निवडणूक येताच, शुभारंभ झाला, तर पालकमंत्री (शिंदे गट) आणि भाजप आमदार (राणा पाटील) यांच्यात श्रेयवादाची ‘तू-तू-मै-मै’ सुरू झाली. प्रकरण इतकं तापलं की आता थेट न्यायालयात गेलंय.
थोडक्यात, धाराशिवकरांना रस्ता मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या राजकीय ‘तमाशा’ मात्र ‘हाऊसफुल्ल’ सुरू आहे.
निवडणूक जाहीर झालीये. ४१ नगरसेवक निवडायचे आहेत, त्यात निम्म्या महिला. आणि नगराध्यक्षपद पण थेट जनतेतून, तेही (ओबीसी) महिलेसाठी राखीव.
इथेही आघाडी-युतीत भारी ‘कॉमेडी’ सुरू आहे. महाविकास आघाडीकडे नगराध्यक्षपदासाठी (म्हणजे एका जागेसाठी) एकूण ५ इच्छुक उमेदवार आहेत. पण खरी गर्दी तर महायुतीत आहे. एकट्या भाजपकडे तब्बल १६ उमेदवार आहेत!
अहो, हे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागवलेत की लग्नाची वऱ्हाडी मंडळी जमा झालीयेत? एका जागेसाठी सोळा जण! म्हणजे ‘एक अनार, सोळा बिमार’ अशी परिस्थिती आहे.
या सगळ्या जल्लोषात आणि गोंधळात, आमदार राणा पाटील यांनी एक ‘जुनं गाजर’ पुन्हा एकदा जनतेसमोर धरलं आहे.
ताजं आश्वासन (नोव्हेंबर २०२५): “उजनी पाणीपुरवठा योजना आपण यशस्वी केली, तसंच आता धाराशिव शहराला २४ तास मुबलक पाणी देणार. हे स्वप्न नाही, हे करणारच!”
सत्य परिस्थिती:
१. हीच योजना १५ वर्षांपूर्वी (तेव्हा ते राष्ट्रवादीत होते) १५० कोटी खर्चून आणली.
२. तेव्हाही त्यांनी ‘२४ तास पाणी’ देणारच, असंच आश्वासन दिलं होतं.
३. त्या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आणि योजना ‘फेल’ गेली.
४. सध्या शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी येतं. (उन्हाळ्यात १५ दिवसांनी!)
लोक विचार करतायत की, दादा हे ‘२४ तास पाणी’ देणार म्हणजे नेमकं काय? दिवसाचे २४ तास, की पुढच्या २४ वर्षांनी?
सगळ्यात मोठा विनोद: सध्या तेरणा आणि रुईभर धरणं तुडुंब भरून ‘ओव्हरफ्लो’ वाहत आहेत. धरणं भरलेली, शहर तहानलेलं आणि नेते मात्र आश्वासनं देण्यात पटाईत.
तर, धाराशिवकर सध्या बिहारच्या विजयात खुश आहेत. असू देत. स्वतःच्या नळाला पाणी येण्याचा आनंद साजरा करायला अजून बराच अवकाश आहे. तोपर्यंत, आमदार साहेबांच्या या ‘पुनःप्रक्षेपित’ (Re-telecast) आश्वासनांवरच तहान भागवावी लागणार!





