धाराशिव – शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकारातून सोमवारी शहरात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.
शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची गेल्या तीन वर्षांपासून दुरवस्था झाली असून, नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. याच दुर्लक्षाचा परिणाम म्हणून ओंकार जाधवर या तरुण व्यापाऱ्याचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला.
या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी संबंधित यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बंदच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध 36 संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 48 हून अधिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला.
या मोर्चात जिल्हा व्यापारी महासंघ, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, विविध व्यावसायिक संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आदींचा समावेश होता. बंदमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.