धाराशिव ! उस्मानाबाद ऐवजी धाराशिव हे नाव देऊन जणू काही शहराचे कायापालट होईल अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. शहराच्या नावाबरोबरच येथील व्यवस्थेतही आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.
गेल्या तीन वर्षांपासून धाराशिव नगर पालिकेवर प्रशासक आहे. रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध नाही. परिणामी, रस्त्यांची कामे सावर्जनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली. परंतु, राजकीय दबावाखाली काम करणारे अधिकारी आणि कामे न करता बिले उचलणारे कंत्राटदार यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून २२ वर्षीय तरुण ओंकार जाधवर यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेला अपघाती मृत्यू हा धाराशिवच्या विकासातील एक काळा डाग आहे. या घटनेने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकारातून शहरात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. विविध ३६ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.धाराशिव मधील व्यापारी उशिरा का होईना अखेर जागे झाले आहेत.
ही घटना केवळ एका तरुणाच्या मृत्यूची नाही, तर ती प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे आणि राजकीय हस्तक्षेपाचे प्रतिक आहे. धाराशिवच्या विकासासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप यांना आळा घालून विकासकामांना प्राधान्य दिले पाहिजे. अन्यथा, अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनीही आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे. प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. केवळ नावात बदल करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या कर्तव्यात कमी पडत आहे. भ्रष्टाचाराचे जाळे एवढे घट्ट आहे की, एसआयटी चौकशी सुरू असूनही त्याचा काहीही परिणाम दिसत नाही. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
धाराशिव शहराचे नाव बदलून त्याचे भविष्य बदलणार नाही. शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागतील. भ्रष्टाचाराला आळा घालून विकासाची खरी व्याख्या जनतेसमोर मांडावी लागेल. अन्यथा, ओंकारसारखे अनेक बळी या बेफिकिरीच्या आणि भ्रष्टाचाराच्या भस्मासुरात होरपळत राहतील.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह