धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लाच प्राध्यापिका’ बाईसाहेबांनी पुन्हा एकदा आपले ‘प्रतिभाशाली’ खेळ दाखवत चर्चेला सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी केलेल्या प्रतिनियुक्त्या पैसे उकळून सुरळीत सुरू झाल्या होत्या, पण अचानक त्या रद्दबातल करण्याचा आदेश निघाला! यामागचा हेतू काय? तर अधिक पैसे वसूल करण्याचा नवीन प्रयोग!
आदेशाचा मजकूर वाचून हसण्याशिवाय काही करता येत नाही, कारण “जर सर्व नियमांचे पालन करून प्रतिनियुक्त्या रद्द करायच्या होत्या, तर एका झटक्यात सगळ्या रद्द का नाही केल्या?” असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण देत आहे.
आणखी गंमत म्हणजे ‘लाच प्राध्यापिके’च्या कृपाछत्राखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र आदेशाने चिमटाही काढलेला नाही. आस्थापना विभागातील ‘तृप्त’ कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या तशाच ठेवल्या आहेत. अर्थात, ज्यांनी ‘प्राध्यापिकेचा नियमाप्रमाणे कट’ दिला आहे, त्यांना सुरक्षित ठेवणे ही नैतिक जबाबदारी वाटली असावी.
मात्र, ज्यांनी नियमांप्रमाणे ‘कट’ दिला नाही, त्यांना सरळ मुख्यालयाच्या बाहेरची वाट दाखवण्यात आली आहे. तिथेच एका नव्या ‘भारी रकमेच्या तलाठी’ने आपल्या पदावर हजेरी लावली आहे.
या सोयीस्कर प्रतिनियुक्त्या रद्द करण्यामागचा हा नवीन खेळ आता सर्वांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात “हे प्रकरण तपासाला कधी जाणार?” अशी चर्चा रंगली आहे. जिल्हाधिकारी महोदय या विनोदी नाटकाचा शेवट कसा करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
(संपूर्ण प्रकरणाचा तपास होईल का, की हेही एका नवीन प्रतिनियुक्तीच्या कथेने झाकले जाईल, हे काळच ठरवेल!)